मुंबई | Mumbai
सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील (Malshiras taluka) मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर (MLA Uttamrao Jankar) यांच्या गटातर्फे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र पोलिस प्रशासनाने मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार जानकर यांनी स्थानिकाशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. तसेच शरद पवार यांनी देखील आज स्थानिकांशी चर्चा करून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासित केले. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “शरद पवार (Sharad Pawar) यांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करणे योग्य नाही. पराभव झाल्यावर तो स्वीकारायला हवा होता. पण पराभव स्वीकारता येत नाही म्हणून जनतेला कन्फ्युज करण्याचे आणि आपले अपयश लपवण्याचे काम हे शरद पवार करत आहेत. विधानसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव झाला. त्यांना जनतेने नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे. त्यामुळे यामधून जनतेची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले डिपॉझिट वाचवण्याकरता शरद पवार धडपड करत आहेत. मारकडवाडीमध्ये आलेले लोक हे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत. जनतेने विधानसभेला यांना दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा आता नाकारला आहे,” असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी सांगितले.
बावनकुळे पुढे म्हणाले की, “शरद पवार, राहुल गांधी किंवा अजून त्यांच्या मविआच्या नेत्यांनी कितीही नौटंकी केली तरी काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्र यांच्या नौटंकीला कंटाळला आहे. महायुती विकास करते आहे हे जनतेला कळलं आहे त्यामुळे महाराष्ट्राने महायुतीला (Mahayuti) मतदान (Voting) केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.महाविकास आघाडीला वाटत असेल की ईव्हीएममध्ये चूक आहे तर मग निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा दिला पाहिजे. अनेक निवडणुका झाल्या आहेत ज्यात अपयशही आले आहे. लोकसभेत आम्हाला अपयश आलं आम्ही काही ईव्हीएमला (EVM) दोष दिला नाही. ज्या चुका झाल्या त्या सुधारुन आम्ही पुढे गेलो. आता या वयात शरद पवार यांनी किती खोटेपणा करायचा?”, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.