Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याबावनकुळेजी, गप्पा काय झोडता? महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा; अंबादास दानवेंचा पलटवार

बावनकुळेजी, गप्पा काय झोडता? महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा; अंबादास दानवेंचा पलटवार

मुंबई | Mumbai

काल शिवसेना ठाकरे गट (ShivSena Thackeray Group) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावरून भाजप नेतेही आता जशास तसे प्रत्युत्तर देत असून ठाकरे गटाचे नेतेही आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल, अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. त्याला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रत्युत्तर देत २०२४ च्या गप्पा काय झोडता? महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा. लोक कोणाच्या बाजूने कौल देतात ते दिसेल, असे आव्हान भाजपला दिले.

अंबादास दानवे यांनी काय म्हंटल?

अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, ज्या माणसाकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अश्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची इतकी वाट तुम्हाला पहावी लागते, चंद्रशेखर बावनकुळेजी. किती ती आतुरता तुमची? याचे कारण एकच. हा आमचा नेता आजही तितकाच बलशाली आहे! २०२४ च्या गप्पा काय झोडता? आपल्या क्षमतांवर एवढाच दृढ विश्वास असेल तर महापालिकेच्या लांबलेल्या निवडणूका लावा. लोक कोणाच्या बाजूने कौल देतात ते!

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय? तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. नरेंद्र मोदींजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं. औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. २०२४ सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय.

- Advertisment -

ताज्या बातम्या