Friday, May 3, 2024
Homeनाशिकखाटासंदर्भात खासगी रुग्णालयांनी दिलेल्या माहिती संदर्भात तपासणी

खाटासंदर्भात खासगी रुग्णालयांनी दिलेल्या माहिती संदर्भात तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात वाढती करोना रुग्णांची लक्षात घेता मनपा प्रशासनाने शासनाच्या आदेशानुसार शहरातील ३० किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण शय्या असलेल्या ११० रुग्णालयातील ८० टक्के खाटा आरक्षित केल्या आहेत. यासंदर्भात खाजगी रुग्णालयांनी दिलेल्या माहितीसंदर्भात आता नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांकडून शहरातील या रुग्णालयाची तपासणी सुरू केली आहे.

- Advertisement -

राज्यात करोना बाधीतांचा वाढता आकडा लक्षात घेत मे महिन्यात सर्वच खाजगी रुग्णालये यांंच्याकडील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मागील महिन्यात नाशिक महापालिका प्रशासनाने शहरातील ५५० रुग्णालये पत्र ८० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याची तयारी ठेवा आणि आपल्या रुग्णालयातील खाटासंदर्भातील माहिती तात्काळ देेण्याची सुचना केली होती. यानंतर खाजगी रुग्णालयांनी माहिती महापालिका प्रशासनाकडे पाठविली होती. नंतरच्या काळात शहरातील ३० खाटांचे किंवा त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या खाजगी रुग्णालयातील आरक्षित करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आले होते. यात ३० किंवा ३० पेक्षा जास्त खाटा असलेल्या ११० खाजगी रुग्णालयांपैकी बहुतांश रुग्णालयाच्या खाटा आरक्षित करण्याचे काम आरोग्य व वैद्यकिय विभागाकडून करण्यात आले

आरक्षित केलेल्या खाटात आयसीयु बेड, व्हेंटीलेटर बेड व ऑक्सीजन बेड यासंदर्भातील माहिती घेण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयाकडून आलेल्या बेडची माहिती नगर रचना विभागाकडून तपासण्यात आल्यानंतर आणि आता दिलेल्या बेडचा आकडा पाहता मिळालेल्या माहितीवरुन संशय निर्माण झाला आहे. यामुळेच आता महापालिका प्रशासनाने नगररचना विभागाची ६ पथके तयार करुन शहरातील खाजगी रुग्णालयांची तातडीची तपासणी सुरू केली आहे.

नगररचनाकडून आजपासून सुरू करण्यात आलेल्या प्रत्यक्ष तपासणीत खाजगी रुग्णालयातील मंजूर नकाशातील जागा (क्षेत्रफळ) व प्रत्यक्ष वापरली जात असलेली जागा, आयसीयु बेड किती, व्हेंटीलेटर बेड किती, एकुण बेड किती व अनधिकृत वापर यांसंदर्भातील सर्व माहिती हे पथक प्रत्यक्ष पाहणी करुन नोंदवून घेणार आहे. या माहितीवरुन रुग्णालयाकडून दिलेली माहितीतील वास्तव समोर येणार आहे. महापालिकेला दिलेल्या माहितीत दिलेल्या खाटांची संख्या दडविली गेली असल्यास हे बेड पुढच्या काळात करोना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच अनधिकृत वापरासंदर्भात कार्यवाही देखील संबंधीतांवर प्रस्तावीत होणार आहे. ही प्रत्यक्ष तपासणी करुन नगररचना विभागाच्या पथकाकडुन ही माहिती आयुक्तांना दिली जाणार आहे. यातून खाजगी मिळणार्‍या ८० टक्के खाटांच्या संख्येत वाढ होणार असुन यातून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय पथक पाहणी करणार

नाशिक शहरात करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपुर्ण राज्यात ही आकडेवारी जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र शासनाच्या करोनासंदर्भात अभ्यास व मार्गदर्शन करणार्‍या पथकाने मुंबई, पुणे, जळगांव येथे पाहणी पुर्ण केली आहे. हे पथक या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्यात नाशिक शहरात येत आहे. या पाहणीत नाशिक शहरातील रुग्णांची माहिती आणि खाजगी रुग्णालयाकडून पुरविण्यात येत असलेल्या खाटांची माहिती हे पथक घेणार आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदर्भात हे पथक मार्गदर्शन देखील करणार आहे.

आपत्कालीन हेल्पलाईन

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करोना आपत्कालीन हेल्पलाईन करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे. नाशिक महानगर पालिका हद्दीतील नागरिकांना कोरोना विषयी कोणतीही माहिती आवश्यक असल्यास तसेच याबाबत कुठलीही अडचण निर्माण झाल्यास त्यांना त्वरीत मदत प्राप्त व्हावी या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करोना आपत्कालीन हेल्पलाईन करण्यात आलेली आहे.नागरिकांनी 1) 0253-2317292 (2)9607432233 (3)9607601133

या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला 24 X 7 मदत मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या