Thursday, July 4, 2024
Homeराजकीय"अजितदादा भाजपला आताच सांगा की, विधानसभेला…"; लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांची मोठी मागणी

“अजितदादा भाजपला आताच सांगा की, विधानसभेला…”; लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांची मोठी मागणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशात सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून सात पैकी सहा टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर आता उर्वरित शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवार (दि. ०१ जून) रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवरील मतदान (Voting) पाचव्या टप्प्यात पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष ०४ जूनच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून आज महायुतीमध्ये (Mahayuti) असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. यावेळी बैठकीत बोलतांना पक्षाचे जेष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांसमोर मोठी मागणी केली आहे.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. त्यामुळे आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी ८०- ९० जागा देण्याचा जो शब्द दिला आहे त्याची आठवण करून द्या, अशी मागणी भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे.

तसेच आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिला होता की विधानसभेला योग्य जागा मिळतील. त्यामुळे आता आपल्याला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर आपल्याला ८०-९० जागा मिळाल्या तर आपले ५०-६० आमदार निवडून येतील. आता ५० आहेत म्हणजे आम्ही ५० जागा घेऊ असे होणार नाही. त्यामुळे भाजपला आताच सांगून टाका की, आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या