मुंबई । Mumbai
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना, ओबीसी नेतेही आता आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एकवटले आहेत. आज माध्यमांशी बोलताना भुजबळांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे. “मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केली आहे, तर आम्हीही मुंबई जाम करू शकतो. हे आमच्यासाठी अवघड नाही,” असे भुजबळ म्हणाले.
भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, मनोज जरांगे पाटील ज्या हैदराबाद गॅझेटचा आधार घेत आहेत, त्यातही मराठा आणि कुणबी समाज वेगळा दाखवण्यात आला आहे. १९२१ च्या आकडेवारीनुसार, त्यावेळी दोन लाख मराठा होते, तर केवळ ३३ हजार कुणबी होते. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस असोत की शरद पवार, ५० टक्क्यांच्या मर्यादेत कुणीही आरक्षण देऊ शकत नाही.” मराठा समाज सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास नसतानाही आरक्षणाची मागणी करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
भुजबळांनी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणाचा लाभ घेता येत असल्याचे सांगितले. “केंद्र सरकारने जो कायदा केला आहे, त्यानुसार आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला १० टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यात मराठा समाजाला मोठा फायदा झाला असून, १० पैकी ८ टक्के उमेदवार मराठा समाजाचे असल्याचे सरकारने जाहीर केले आहे,” असे भुजबळ म्हणाले. त्यांनी मराठा आणि कुणबी एक आहेत, या भूमिकेला “मूर्खपणा” म्हटले.
भुजबळांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, “तुम्ही जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, तर आम्हालाही मुंबईत येऊन आंदोलन करावे लागेल.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले आहे. उद्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या भूमिकेसाठी राज्यभर आंदोलने केली जातील आणि निवेदनही दिले जाईल, असे भुजबळांनी जाहीर केले.




