संभाजी नगर। Sambhaji Nagar
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या नादात तरुणाई काय करेल हे सांगता येत नाही. सेल्फीची क्रेझ आता रिल्स आणि व्लॉगवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, सेल्फी घेण्यासाठी धडपडणारा युवा वर्ग आता रिल्स बनवण्यासाठी आणि तो सोशल मीडियावर शेअर करुन नेटीझन्सचं अटेंशन मिळवण्याचा प्रयत्न करतो.
मात्र, सेल्फीच्या नादात जीव गमावलेल्या घटना घडल्या असतानाच, आता रिल्स बनवण्याच्या नादात एका २३ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ ही भयानक घटना घडली. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय तरुणी व तिचा मित्र संभाजीनगर येथून एका कारने सूलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात आले होते. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवताना तिने मित्राला सांगितले की, मी कार चालवते तू त्याची रिल बनव.
तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिनं कार पुढं नेण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार पाठीमागे असलेल्या दरीत कोसळली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणी छत्रपती संभाजी नगर शहरातील रहिवासी होती.