Thursday, May 2, 2024
Homeनगरउद्या श्रीरामपूर बंदचे आवाहन

उद्या श्रीरामपूर बंदचे आवाहन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा श्री शिवाजी चौकातच बसवावा या श्रीरामपुरातील तमाम शिवप्रेमी

- Advertisement -

नागरिकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावीत, हा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौक सोडून अचानक दुसरीकडे व बेकायदेशीरपणे बसविण्याच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात व शिवजयंतीच्या दिवशी श्री शिवाजी चौकात स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपमानास्पदरित्या नगरपालिका प्रशासनाने हलविल्याच्या निषेधार्थ, उद्या रविवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने केले आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

शिवाजी चौकात महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसवावा ही लोकभावना वाढू लागल्याने या मागणीला बायपास करण्यासाठी नगराध्यक्षांनी हा पुतळा दुसरीकडे अचानकपणे बसविण्याचा घाट घातला आहे. हा श्रीरामपूरकरांच्या लोकभावनेचा अपमान आहे. असे काही घडविण्याचा नगराध्यक्षांनी प्रयत्न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटून, गंभीर परिणाम नगरपालिकेला भोगावे लागतील.

त्याचबरोबर, शिवजयंतीच्या दिवशी काही शिवप्रेमींनी श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन केला होता. नगरपालिकेने तातडीने अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हा पुतळा तेथून हलविला. हे कृत्य हिटलरशाहिलाही लाजवणारे असल्याची संतप्त भावना अनेक शिवप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या दोन्ही गोष्टींच्या निषेधार्थ श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने, रविवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन केले आहे. श्रीरामपुरातील व्यापारी बंधूंनी व नागरिकांनी या आवाहनास प्रतिसाद देऊन बंदमध्ये सहभागी व्हावे व बंद यशस्वी करावा, असे आवाहन संघर्ष समितीच्यावतीने डॉ. दिलीप शिरसाठ, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, भाजपाचे प्रकाश चित्ते, नगरसेवक किरण लुणिया, राजेंद्र चव्हाण, संजय पांडे, दीपक दुग्गड, अभिजीत कुलकर्णी, सरपंच महेंद्र साळवी, छावाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र बोलकर, अ‍ॅड. सुभाष जंगले, प्रविण पैठणकर, किशन ताकटे, कुणाल करंडे, योगेश ओझा, मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे, सँडी पवार, सोमनाथ कदम, गणेश भिसे, बाळासाहेब हिवराळे, उमेश धनवटे, सुहास पवार, अजय पडवळकर, प्रविण फरगडे, नागेश सोनवणे, संजय यादव, रवींद्र चव्हाण, विवेक देशमुख, विकी देशमुख यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या