नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं जात असून राहुल सोलापूरकर यांनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत आहे. यानंतर आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका व्यक्त केली असून राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात घणाघाती टीका केली आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानावार चौफेर टीका झाल्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतर ही त्यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला आहे. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने दिसले तिथे ठेचून काढले पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “राहुल सोलापूरकरने अतिशय विकृत विधान केले असून त्याची जीभ हासडली पाहीजे, तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांवर देशद्रोहाच्या कायद्यानुसार कारवाई करावी”, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली. पुढे ते म्हणाले, जगाच्या पाठीवर एकमेव असा महापुरुष होऊन गेला, ज्यांनी ३५० वर्षांपूर्वी एक विचार दिला. भारतच नाही तर अनेक देश त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही. देशातील विविध जाती-धर्माच्या लोकांना आपले कुटुंब समजले. शिवरायांच्या विचारांमुळेच आपली गुलामगिरीतून मुक्तता झाली. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ विधाने केली जातात. राहुल सोलापूरकरने महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वच शिवभक्तांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, “राहुल सोलापूरसारख्या व्यक्तीची जीभ हासडली गेली पाहीजे. महापुरुषांबाबत जे अवमानकारक विधाने करतात त्यांना जनतेने वेचून ठेचले पाहीजे. महापुरुषांबाबत बोलणाऱ्या विकृतांमध्ये वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. जाती-धर्मात जी तेढ निर्माण होते, ती अशाच विकृतांमुळे होत असते. या अगोदरही आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली होती की, अशी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा कायद्यानुसार कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही”, अशी भावनाही उदयनराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराजांचे विचार जपले नाहीत, तर देशाचे तुकडे होण्यास फार वेळ लागणार नाही. त्यासाठी ही विकृत विधाने कारणीभूत आहेत. यापुढे यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे. दिग्दर्शक, निर्मात्यांनीही अशा लोकांना थार देता कामा नये. या लोकांना गाडलं पाहिजे. जर गाडले नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे,” असेही ते म्हणाले आहेत.
राहुल सोलापूरकर नेमके काय म्हणाले होते?
पेटारे-बिटारे काहीच नव्हते. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत. महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती. औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचे पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद ५ हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण, पुरावे आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हंटले, की थोडे रंग भरून सांगावे लागते. मात्र रंजकता आली, की इतिहासाला छेद दिला जातो असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा