Thursday, May 14, 2026
HomeनगरAhilyanagar : सिना नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला

Ahilyanagar : सिना नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील आनंदनगर परिसरात सिना नदीच्या पात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (8 मे) दुपारी 12.16 वाजण्याच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात फोनव्दारे नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी माहिती दिली की, आनंदनगर येथील विक्रांत जिम परिसराच्या आत सिना नदीच्या पात्रात एका नवजात बाळाचा मृतदेह तरंगताना दिसत आहे. माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस अंमलदार गाढे, अतुल काजळे हे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले.

- Advertisement -

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सिना नदीपात्रातील सिमेंटच्या सेप्टर नाल्यात अंदाजे आठ दिवसांचे नवजात अर्भक पाण्यात तरंगताना आढळून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महानगरपालिका, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा केला. त्यानंतर संबंधित नवजात अर्भकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

नायब तहसीलदार व पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या इनक्वेस्ट पंचनाम्यात संबंधित अर्भक हे पुरूष जातीचे असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नवजात अर्भकाचा मृतदेह गुप्तपणे नदीपात्रात फेकून अपत्य जन्माची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली व संबंधित माहितीची तपासणी सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एटीएसची झाडाझडती! राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी छापे;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक...