Sunday, May 19, 2024
Homeजळगावगाव,जिल्हा अन् राज्यासाठी करोनामुक्तीची चळवळ तयार करा

गाव,जिल्हा अन् राज्यासाठी करोनामुक्तीची चळवळ तयार करा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोना महामारीने आपल्याला जखडून ठेवले आहे. विकासात्मक कामे करण्यास कोरोना वेळ देत नाही. कोरोनाने आपल्या अनेक स्वजनांना हिरावून घेतले आहे. त्याला आता आपण हरविले नाही तर आपल्या पुढील पिढ्यांना तो त्रासदायक ठरेल. यामुळे करोनाशी दोन हात करून त्याला कायमचा हद्दपार करा. करोना मुक्तीची चळवळ तयार करून गावासह जिल्ह्याला, राज्याला करोनामुक्त करण्याचा संकल्प करा. असा सल्ला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सरपंचाशी झालेल्या संवादात दिला.

- Advertisement -

करोनामुक्त गाव अभियाना अंतर्गत त्यांनी आज नाशिक विभागातील कोरोनामुक्त गावांच्या सरपंचाशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा विज्ञान व सुचना कार्यालयातून जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथील सरपंच नीता रामेश्वर पाटील, पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्दचे सरपंच सीमा पाटील, चोपडा तालुक्यातील विरावाडे (मालापूर) येथील यावल तालुक्यातील मालोद येथील विशाल म्हाळके हसीना सिराज तडवी हे जिल्ह्यातील चार सरपंच व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, यावल पंचायत समितीचे एच.एम.तडवी उपस्थित होते. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हेही सहभागी झाले होते.

जिल्ह्यात 66 गावांनी रोखले वेशीवरच

करोना महामारीला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील एक हजार 157 ग्रामपंचायतींपैकी एक हजार 79 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील 66 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. त्यामुळे या गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोनामुक्त गाव अभियानात जिल्ह्यातील सरपंचांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.

पहूरपेठ येथील सरपंच नीता पाटील यांनी साधला संवाद

जामनेर तालुक्यातील पहूरपेठ येथील सरपंच नीता पाटील यांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली यात त्या म्हणाल्या की, गावातील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच प्रतिबंधात्मक उपााययोजना गावात आखल्या गेल्या. सॅनिटायझेशनचा वापर, मास्कचा वापर अनिवार्य केला. स्वच्छता पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून कोरोनाला रोखण्याचे काम केले.

संचारबंदी असल्याने 1200 कुटूंबांना अन्नधान्य देण्याची व्यवस्था लोकसहभागातून केली. याकामी गावातील मजूरापासून शेतकरी, अंगणवाडी सेविका, कर्मचारी सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला. कोरोना काळात आशावर्कर, कर्मचारी यांनाही मदत दिली. गावातील प्रत्येकाच्या कोरोना चाचणीसाठी ऑक्सीमीटर, थर्मामिटर यंत्र खरेदी करून आशावर्कर, स्वयंसेवकांना दिले. त्यांनी घरोघरी जावून तपासणी केली. जे पॉझीटीव्ह सदृश्य आढळले त्यांना क्वारंटाइन सेंटर किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल करून उपचार सूरु केले.

करोना साथीत सार्‍या गावाने मला साथ दिली. माझा गाव, माझा परिवार आहे. सध्या गावात एकही रुग्ण कोरोना बाधीत नाही. यापुढेही कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच ठेवू. असे श्रीमती पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या