शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतून गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भाविकांच्या गर्दीचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेत शिर्डीत बालशोषण आणि बालतस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय आहे का? असा अत्यंत गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथून पळवून आणलेल्या दोन निष्पाप अल्पवयीन मुलांना शिर्डीत भीक मागणे आणि कचरा गोळा करण्याच्या कामाला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील उज्जैन येथून दोन लहान मुलांना एका अज्ञात व्यक्तीने फूस लावून शिर्डीत आणले होते. या मुलांकडून मंदिर परिसरात भीक मागवून घेणे आणि कचरा गोळा कडून घेणे अशी कामे करून घेतली जात होती. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही दोन्ही मुले शिर्डीतील एका भागात संशयास्पद रित्या कचरा गोळा करताना आढळली. मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर एलम यांना या मुलांची परिस्थिती पाहून संशय आला. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत या दोन्ही मुलांची तिथून सुटका केली. सुटका केल्यानंतर या मुलांना शिर्डीतील एका सुरक्षित आश्रमात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तत्परतेने पोलिसांशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
विशेष म्हणजे या मुलांच्या कुटुंबीयांनी मध्यप्रदेशातील स्थानिक पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच नोंदवली होती. शिर्डी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून मुलांच्या पालकांशी संपर्क साधला आणि या दोन्ही मुलांना त्यांच्या हक्काच्या घरी, कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. आपल्या हरवलेल्या काळजाचे तुकडे परत मिळाल्याने पालकांच्या डोळ्यात पाश्र्व अश्रू उभे राहिले होते. थेट दुसर्या राज्यातून लहान मुलांना पळवून आणून धार्मिक स्थळी त्यांच्याकडून अशी कामे करून घेतली जात असल्याने शिर्डीत मोठे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भाविक मोठ्या श्रद्धेने शिर्डीत दानधर्म करतात, नेमक्या याच भावनेचा बाजार मांडून या मुलांचा वापर केला जात असल्याचा संशय आहे. या खळबळजनक घटनेमुळे आता बालकल्याण समिती, महिला व बालविकास विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिर्डीसारख्या हाय-प्रोफाइल सुरक्षा असलेल्या ठिकाणी परराज्यातून मुले आणली कशी जातात? मंदिर परिसरात अशा किती टोळ्या सक्रिय आहेत? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केले जात असून, पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे.




