Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai Power Outage : मुंबईतील 'पॉवर कट'मध्ये चीनचा हात?

Mumbai Power Outage : मुंबईतील ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात?

मुंबई l Mumbai

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला होता.

- Advertisement -

त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाला. मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध दैनिकानं केला आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे.

त्या प्रसिद्ध दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध रेकॉर्डेड फ्युचर या २००९ मध्ये स्थापन झालेल्या सायबर सिक्युरिटी कंपनीने घेतला आहे. या सायबर हल्ल्यातील अनेक मालवेअर अ‍ॅक्टीव्ह करण्यात आले नव्हते. म्हणजेच नियोजित हल्ल्याच्या काही टक्के हल्लाच यशस्वी होऊनही मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उडवणारा प्रकार घडला. मात्र या मालवेअर ट्रेसिंगमध्ये कोड रिस्ट्रीक्शन असल्याने यासंदर्भातील संपूर्ण माहिती काढण्यात कंपनीला अपयश आल्याचेही वृत्तात म्हटलं आहे. या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिल्याचे वृत्तात म्हटलं आहे.

तसेच त्या ‘पॉवर कट’चा थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताच्या अर्थिक राजधानीला ठप्प करणारा हा प्रकार चीनमधून झालेल्या सायबर हल्ल्यामुळे असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने चीनसोबत सीमेवर अधिक संघर्ष करु नये असा संदेश देण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

त्याचबरोबर मुंबईमध्ये पॉवर कट हा व्यापक कटाचा भाग होता, अशी माहिती ‘रेकॉर्डेड फ्युचर’ या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून उघड झाली आहे. कमीत कमी १२ सरकारी संस्था या हॅकर्सचं टार्गेट असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं पॉवर युटिलिटी आणि त्यासंबंधी काम करणाऱ्या सेंटर्सचा समावेश आहे.

दरम्यान, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळं आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती. राज्य वीज नियामक आयोग व केंद्रीय वीज प्राधिकरणानंही समिती स्थापन केली होती. सायबर सेललाही तक्रार करण्यात आली होती. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आज तो अहवाल ऊर्जा विभागाला देणार असून त्याबाबत सविस्तर निवदेनही केलं जाईल’ असं राऊत यांनी सांगितलं.

१२ ऑक्टोबरला नेमकं काय झालं?

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली होती. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला होता. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असल्यानं जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात आली होती.

महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाने मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे मालवेअरच्या माध्यमातून केलेल्या सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या