तळेगाव दिघे । वार्ताहर
संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मालदाड मार्गेच्या चिंचोली गुरव ते संगमनेर या डांबरी रस्ता काम अवघ्या सहा महिन्यात उखडले आहे. भ्रष्टाचाराचा आदर्श नमुना ठरलेल्या या डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सदर डांबरी रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चिंचोली गुरवचे माजी सरपंच योगेश सोनवणे यांनी यांनी दिला.
यांसदर्भात सोनवणे यांनी म्हटले की, संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मालदाड मार्गेच्या चिंचोली गुरव ते संगमनेर या रस्त्याचे काम खूप दिवस रखडले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या रस्त्यासाठी थेट विधानसभेत आवाज उठवला होता. मागील सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले आणि अवघ्या सहा महिन्यातच भ्रष्टाचाराचा आदर्श नमुना ठरत या डांबरी रस्त्यांवर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य निर्माण होत रस्त्याची चाळण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव ते संगमनेर या मालदाड, सोनोशी मार्गेच्या रस्त्यासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.
शासकीय अडथळ्यामुळे अनेक दिवस हे काम रखडले होते. मात्र, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर सदर रस्ता कामासाठी निधी देण्यात आला. सदर डांबरी रस्त्याचे काम व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने प्रयत्न केले आणि आवाज उठवला. सदर डांबरी रस्त्याने देवकौठे, चिंचोली गुरव, काकडवाडी, नान्नज दुमाला, सोनोशी, मालदाड, पारेगाव, तळेगाव दिघे परिसरातील नागरिकांचा प्रवास आणि वाहतूक सुरू असते. मात्र, चिंचोली गुरव ते काकडवाडी फाटा दरम्यान डांबरी रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांचे अपघात होत आहे.
चिंचोली गुरव ते काकडवाडी फाटा दरम्यान डांबरी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे दसऱ्याच्या दिवशी सदर रस्त्यावरील सर्व खड्ड्यांमध्ये मेणबत्त्या लावण्यात येतील व पेटती मेणबत्ती आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर दाखवले जाईल असा इशारा चिंचोली गुरव व देवकौठे तरुण मित्र मंडळाने प्रशासनाला दिला आहे. सदर रस्ता म्हणजे उत्तम भ्रष्टाचाराचा नमुना असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी या डांबरी रस्त्याची पाहणी करावी व तातडीने रस्ता दुरुस्ती करावी, अन्यथा मोठे तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चिंचोली गुरवचे माजी सरपंच योगेश सोनवणे तसेच ग्रामस्थांनी दिला आहे.




