नाशिक । प्रतिनिधी Nashik
सिटीलिंक बस ठेकेदाराने वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकवल्याने गुरुवारी (दि.29) पहाटेपासूनच वाहकांनी संप पुकारला होता. मात्र मनपाने 54 लाख रुपयांचे जानेवारीचे बिल अदा केल्याने कर्मचार्यांनी संप मागे घेतला.
मनपाने दोन ठेकेदार नियुक्त केले होते. एक ठेकेदाराने वेतन अदा न केल्याने वाहकानी संप सुरू केला होता. दुसर्या ठेकेदाराद्वारे नाशिकरोड डेपोतील शंभर बसेस सुरु असल्याने नाशिककरांना काही अंशी दिलासा मिळत असला तरी तपोवन डेपोतून सुटणार्या दीडशे बसेस वाहकांनी उभ्या ठेवल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा होता.
मागील दोन वर्षात वेतनावरुन वारंवार संघर्ष उद्भवत असून गुरुवारी पुन्हा वाहकांनी संप पुकारला. विशेष म्हणजे शहरात सिटीलिंक सेवा सुरु झाल्यापासून वेतन या एकमेव कारणावरुन सातव्यांदा संप होता. दरम्यान सातत्याने होत असलेला संप पाहून काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने सिटीलिंक ठेक्याची विभागणी केली. नागपूर येथील युनिटी नावाच्या कंपनीकडे नाशिकरोड डेपोची जबाबदारी दिली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच वेतनाबाबत वाहकांनी सिटीलिंक प्रशासन व ठेकेदाराकडे मागणी केली होती. मात्र याची दखल न घेतल्याने चालकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. संपाची सूचना मिळताच प्रशासनाने संप मिटवण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र तो असफल ठरला. ठेकेदाराने वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने संतप्त कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उगारले होते.अखेर मनपा प्रशासनाने पुढाकार घेत कामगारांचे 54 लाख रुपयांचे जानेवारीचे बिल अदा केले, वाहकांना वेतन मिळाल्याने कर्मचार्यांनी संप मागे घेतला.