Friday, September 20, 2024
Homeक्राईमचार ठिकाणी सुरू होती धोकादायक पध्दतीने गॅस रिफिलिंग

चार ठिकाणी सुरू होती धोकादायक पध्दतीने गॅस रिफिलिंग

अप्पर पोलीस अधिक्षकांच्या पथकाची छापेमारी || तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहरासह उपनगरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या पथकाने छापेमारी केली. कोतवाली, तोफखाना व एमआयडीसी हद्दीत हा अवैध धंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. चार ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सेंटर चालकाविरूध्द संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अप्पर अधीक्षक खैरे यांच्या पथकाने एकाचवेळी छापेमारी करून अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा काळा बाजार चव्हाट्यावर आणला आहे.

नालेगाव परिसरातील अमरधाम शेजारी आफताफ अब्दुल सय्यद (वय 22 रा. सबजेल चौक, नगर) हा अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर चालवित होता. पथकाने शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. गॅस टाक्या, वजनकाटा, गॅस रिफिलिंग मशीन असा 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सय्यद विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने दुसरी कारवाई कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतच केली. सिना नदीच्या पात्रालगत अमरधाम शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये कृणाल अर्जुन लांडगे (वय 23 रा. संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन) हा अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर चालवित होता. त्याच्या ताब्यातून दोन वाहने, गॅस टाक्या, गॅस रिफिलिंग मशीन असा एक लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लांडगे विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई शनिवारी दुपारी केली.

पथकाने तिसरी कारवाई तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत केली. सावेडी गावातील खंडोबा मंदिराजवळ, जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकला. या सेंटरचा मालक जयंत छगन भिंगारदिवे (वय 40 रा. बौध्द वस्ती, सावेडी गाव) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवनागापूर परिसरातील मनमाड महामार्गावरील सिध्दी लॉन शेजारी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवरही पथकाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी राजू साहेबराव पवार (वय 24, रा. आई लक्ष्मीआई मंदिराजवळ, नागापूर) व संतोष महादेव आजबे (रा. नवनागापूर) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून वाहन, गॅस टाक्या, वजनकाटा व गॅस रिफिलिंग मशीन असा एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
धोकादायक पध्दतीने व सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या गॅस रिफिलिंग सेंटर चालविले जात आहे. यावर पोलिसांकडून छापेमारी सुरू झाल्यानंतर हा अवैध धंदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र यावर पुरवठा विभागाने कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. पुरवठा विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या