Friday, May 3, 2024
Homeनगरशहरातील ओढे व नाल्यांवर 8.23 किमीपर्यंत अतिक्रमण

शहरातील ओढे व नाल्यांवर 8.23 किमीपर्यंत अतिक्रमण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील उपनगर परिसरात 41 ओढे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पाईप टाकून बंद करण्यात आले आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 95 किमी लांबीच्या ओढे व नाल्यांपैकी 8.23 किमी लांबीचे प्रवाह पाईप टाकून वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. या विषयाचा पाठपुरावा करणारे शशिकांत चंगेडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहराचे 1972 पासून ते आत्तापर्यंतचे विकास आराखडे व नकाशे तपासण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी दिली.

- Advertisement -

पाईप टाकून ओढे व नाले बुजविण्यात आल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. यासंदर्भात शशिकांत चंगेडे हे गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी व पाठपुरावा करत आहेत. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी महापालिकेत चंगेडे व मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महापालिकेने नाशिकच्या कंपनीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील सुमारे 95 किमी लांबीच्या 41 ओढे व नाल्यांवर 8.23 किमीपर्यंत अतिक्रमण झालेले आहे. यात 4.91 किमी लांबीचे नाले सद्यस्थितीत मोकळ्या जागेत असून ते पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. तर 3.32 किमी लांबीच्या नाल्यांवर इमारतींचे बांधकाम झालेले आहे.

सदरची माहिती महापालिकेकडून चंगेडे यांना बैठकीत देण्यात आली आहे. ओढे व नाले अस्तित्वात असताना पाईप टाकून त्याचे प्रवाह अरुंद करण्यात आले. विकास आराखड्यांवर अनेक नाल्यांचा समावेश मनपाने केलेला नाही. यापूर्वीच्या काळात जुन्या नकाशांवर याचा उल्लेख होता. त्यामुळे जुने नकाशे व विकास आराखडेही मनपाने तपासावेत अशी भूमिका चंगेडे यांनी मांडली. त्यानंतर मनपाकडून सन 1972 पासूनचे विकास आराखडे व नकाशे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या