Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar news : अहिल्यानगरमध्ये राडा, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

Ahilyanagar news : अहिल्यानगरमध्ये राडा, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

दगडफेकीत सात पोलीस जखमी, वाहनांचे नुकसान || पोलिसांचा लाठीचार्ज || सुमारे 200 जणांवर गुन्हा, 32 ताब्यात

अहिल्यानगर । प्रतिनिधी | Ahilyanagar

एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान रस्त्यावर रांगोळी रेखाटून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्ग कोठला परिसरात रोखून करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमाव अचानक आक्रमक झाला व त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. यात वाहनांच्या काचा फुटल्या, बंदोबस्तावरील सात पोलीस व एक महिला होमगार्ड जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला व धरपकड करीत सुमारे 32 जणांना ताब्यात घेतले असून त्यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे 150 ते 200 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार संशयितांची धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.

- Advertisement -

नगर शहरातील बारातोंटी कारंजा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकुरावरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलीस ठाणे गाठले. याबाबत शेख अल्तमश सलिम जरीवाला (वय 34, रा. पिरशाहखुंट, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोंटी कारंजा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून संग्राम रासकर याला अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होऊन संशयित अटक केल्यानंतर देखील मुस्लिम समाज आक्रमक होता. पोलीस ठाण्याबाहेर जमावाने निदर्शने करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. त्याच दरम्यान प्रवीण संजय खराडे (वय 20 हल्ली रा. माळीवाडा, अहिल्यानगर, मुळ रा. कर्जत) हा युवक आपल्या मित्रासह वाहनाची चावी बनवण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील तक्ती दरवाजा परिसरात आला होता.

YouTube video player

त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर अंदाजे 60 ते 70 युवक जमा झालेले होते. चावी बनवताना प्रवीण खराडे बाजूला उभे असतानाच, अचानक जमावातील 10 ते 15 अनोळखी युवक त्यांच्या जवळ आले. हाच होता, हाच तो असे म्हणत त्यांनी प्रवीणला मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे. यासंदर्भात प्रवीणने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अनोळखी 10 ते 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरही आणखी आक्रमक होत मुस्लिम समाजाच्या जमावाने कोठला परिसर गाठले. फलटण चौकी समोर अंदाजे 150 ते 200 लोकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता जमाव जमवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले. पोलिसांनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले असले तरी जमाव ऐकला नाही. काही तरूणांच्या चिथावणीमुळे जमाव बेकायदेशीर पध्दतीने रस्त्यावर राहून दगडफेक करत वाहनांची नुकसान केली.

जमाव बेकायदेशीर पध्दतीने ईदगाह मैदानाकडे धावताना रिक्षा व दुचाकीवरही दगडफेक केली. पोलिसांनी तात्काळ लाठीमार करत जमावाला पांगवले. त्यामुळे पळापळ झाली. या घटनेमुळे कोठला परिसरात व संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे व शिरीष वमने, पोलीस निरीक्षक किरण कबाडी व आनंद कोकरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोठला परिसरात दगडफेक व तोडफोड प्रकरणी सुमारे 32 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अंमलदार तनवीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. जमावाच्या दगडफेकीत पोलीस अंमलदार बाबासाहेब भापसे, रोहिदास हरदास, सिध्दांत बडे, नवनाथ साळुंके, विकास साबळे, दादासाहेब जाधव, बाळासाहेब कदम व होमगार्ड शैला आडोळे जखमी झाले आहेत.

दरम्यान, शहरामध्ये सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या घटना घडत आहेत. काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करून तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट व्हायरल करतात. या षडयंत्राच्या मास्टरमाईंडचा पोलिसांनी शोध घेऊन त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्याप्रकरणी गुन्हा
शहरात सोमवारी सकाळी शिव प्रतिष्ठाण हिंदुस्तान दुर्गा माता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मंगलगेट अशी ही दौड होती. दरम्यान, दौड मार्गावर भाविकांनी स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. मात्र, सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान माळीवाडा येथील केवळ हॉस्पिटल ते बुरूड गल्ली परिसरात, बॉम्बे बेकरी जवळ, अज्ञात व्यक्तींनी दौड मार्गावर हाडांचे तुकडे व मांसाचे तुकडे टाकलेले दिसून आले. या प्रकारामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास भिमराव मुदगल (वय 45, रा. नालेगाव, गाडगीळ पटांगण) यांनी फिर्याद दिली आहे.

आ. जगताप यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
कोतवाली पोलीस ठाण्या समोरच लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलक व तरूणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आ. संग्राम जगताप आक्रमक होत त्यांनी संबधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात 2 तास ठिय्या दिला. यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले, पवित्र नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र शहरात काहींनी जातीय तेढ निर्माण करणारे फलक लावून मुद्दाम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे फलक त्वरित काढण्यात यावेत. संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शहरातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठवता शांतात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

ना. विखे यांच्याकडून शांततेचे आवाहन
नगर शहरात घडलेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई केली आहे. मात्र कोणी कायदा हातात घेवून सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिल्या असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. कोणत्याही आफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरही काही लोकांनी जाणीवपुर्वक पोलीस प्रशासानास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वाना आहे. परंतू या घटनेचा गैरफायदा घेवून धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...