Tuesday, July 2, 2024
Homeनगरकापड दुकानदाराची महिलेकडून फसवणूक

कापड दुकानदाराची महिलेकडून फसवणूक

टेक्स्ट मेसेज पाठवून ऑनलाईन पेमेंट केल्याचा केला बनाव

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

- Advertisement -

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे कापड दुकानातून खरेदी केलेले कपड्यांचे पेमेंट ऑनलाईन करण्याऐवजी केवळ त्या रकमेचा टेक्स्ट मेसेज पाठवून पावणे नऊ हजार रुपयाची फसवणूक केली. त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. लोणी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पिंपरी निर्मळ येथील हायवे लगत असलेल्या सानिका कापड दुकानात रविवारी सायंकाळी एक महिला कपडे खरेदी करण्यासाठी आली. त्यावेळी तिने आठ हजार आठशे रुपयांचे कपडे खरेदी केले. माझ्याकडे रोख स्वरूपात रक्कम नसून मी आपणाला फोन पे वर ही रक्कम पाठवते, असे सांगून तिने फोनमधून येथे दुकानदार असलेल्या वनिता घोरपडे यांच्या मोबाईल नंबरवर या रकमेचा केवळ टेक्स्ट मेसेज पाठवला. सौ. घोरपडे यांना हा मेसेज आल्यानंतर त्यांना वाटले पैसे जमा झाले. त्यांनी सदर महिलेला माल देऊन टाकला.

हे कपडे घेऊन सदरची महिला एका साथीदारासह दुचाकीवर निघून गेली. मात्र काही वेळाने फोन पेमध्ये तपासले असता सदर रक्कम जमा झालेली नव्हती. वस्तुस्थिती पाहिल्यानंतर लक्षात आले की, संबंधित महिलेने आपल्या मोबाईलवरून केवळ टेक्स्ट मेसेज पाठवलेला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौ. घोरपडे यांनी लोणी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे. संबंधित दुकानात सीसीटीव्ही उपलब्ध असल्याने संबंधित महिलेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना उपलब्ध झालेले आहेत. या संदर्भात लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

ऑनलाईन व्यवहार करण्यास सोपे व व्यवहारिक दृष्टीने चांगले असले तरी थोडेसे दुर्लक्ष जरी केले तरी मोठा आर्थिक फटका बसू शकतो हेच यातून सिद्ध होत असून याबाबत व्यावसायिकांनी सजग व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या