नागपूर | Nagpur
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच या मुद्यांवर विधीमंडळात चर्चा करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांच्या या पत्राला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
‘राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत आपण याआधी सविस्तर आकडेवारी मांडलेली आहे. मात्र, तरी त्यांच्या काही शंका असतील तर त्यावर नक्की उत्तर दिले देईल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“मी अजून पत्र वाचलेले नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्याची कारणे दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेले आहे. यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण बेपत्ता तक्रार दाखल करतो त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते. वर्षभरात 90 टक्क्यांच्या वर मुली परत आणतो. उरलेल्या पुढच्या वर्ष, दीड वर्षात परत येतात, त्यांनी नेमके काय पत्र लिहिले आहे ते मी न वाचल्याने उत्तर देऊ शकणार नाही, मात्र ज्या काही शंका असतील त्यावर मी नक्की उत्तर देईन,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले
“राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिले मला माहिती नाही. पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत. मी या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की जेव्हा लहान मुलं हरवतात. तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष तपास योजना राबवतो. या विशेष मोहिमांच्या दरम्यान हे लक्षात येते की अनेकांच्या मिसिंग तक्रारी दाखल नसतानाही त्यांना आपण शोधून काढलेले आहे”, असे योगेश कदम यांनी म्हटले.
“जेव्हा अशा केसेस घडतात तेव्हा ९० टक्क्यांपेक्षा जास्त मुले आपल्याला परत सापडतात. त्यातील काही मुले हे स्वत:हून निघून गेलेली असतात, किंवा आणखी काही वेगळ्या कारणांनी गेलेली असतात. यातील ९० टक्के मुले पुन्हा सापडतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही उरलेल्या १० टक्के मुलांना शोधत नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम आम्ही राबवतो. या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गांभीर्याने लक्ष दिलेले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत. हा विषय नक्कीच गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात नक्कीच उपाययोजना राबवलेल्या आहेत”, असे योगेश कदम यांनी म्हटले.
राज ठाकरे काय म्हणाले?
“लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचे सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुले पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते?,” असे प्रश्न राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




