मुंबई | Mumbai
मराठवाड्यात सहा जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातले. पुन्हा मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचं गडद सावट निर्माण झाले आहे. नदी, नाले यांनी प्रवाह बदलला आहे, शेतशिवारात, घरांमध्ये पाणी शिरले आहे. गोदावरी, दारणा, पालखेडसह मराठवाड्यातील कयाधू, बीड, लातूर आणि धाराशिवमधून जाणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा पूर आला. हेच नाही तर अजूनही अनेक गावांना पाण्याचा वेढा आहे. पूरस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानचे पंचनामे सुरू केली आहेत. हेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात सर्व यंत्रणा असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट
याबाबतची पोस्ट फडणवीसांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे ८ जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे. सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
जलसंपदा विभागाकडून घेतला आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत.
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती असल्याची माहिती देण्यात आली. माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग, हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होत असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. ही माहिती सकाळी 9 वाजतापर्यंतची असल्याची माहिती आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





