मुंबई / प्रतिनिधी Mumbai
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण न देणे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना चांगलेच महागात पडले आहे. राज्य सरकारने सिंघल यांची सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली केली असून त्यांची नियुक्ती धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या मुख्य कार्य अधिकारी पदी झाली आहे. तर सिंघल यांच्या जागी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त या नवनिर्मित पदावर झाली आहे. तर डॉ. जोशी यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांची वर्णी लागली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उद्योग विकास आयुक्त म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची बदली आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावर करण्यात आली आहे.




