सोलापूर | Solapur
मराठवाड्यातील सोलापूर, बीड आणि जालना या जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करंत आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv District) नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. याशिवाय कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि मंत्री पंकजा मुंडे हे जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन हे बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करत आहे. मात्र मंत्र्यांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी संवाद साधून अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांच्या व्यथा समजून घेत मागण्याही ऐकून घेतल्या.यावेळी त्यांनी ड्रोन दृश्य बघितली, यानंतर संपूर्ण परिस्थिती जाणून घेत नुकसानीचा आढावा घेतला. पुरामुळे कसं थैमान माजलं, नेमकं किती नुकसान झालं याची आकडेवारीही त्यांनी जाणून घेतली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत केली जाईल.तसेच पहिल्यांदा शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जाणार असून केंद्र सरकारकडून देखील शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घराचे, अन्नधान्याचे नुकसान झाले आहे अशा लोकांना देखील सरकारकडून मदत केली जाणार असल्याचे”, त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “शासनाने कोणतेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिकांना तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता, नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.




