मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर केला आहे. कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईत हजर झाले आहेत. पण कोकाटेंची प्रकृती बरी नसल्याकारणाने त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत महत्वाचे भाष्य केले आहे. आता क्रीडामंत्री पद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागते, यावर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र, त्यावर थेट भाष्य न करता मुख्यमंत्री फडणवीसांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात मोघम भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. यापलीकडे देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा, अटक वॉरंट याबद्दल कोणतीही टिप्पणी केली नाही.
काय आहे प्रकरण?
बुधवारी (ता. १७ डिसेंबर) रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात माणिकराव कोकटेंशी संबंधित सदनिका घोटाळा प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने त्यांना देण्यात आलेली २ वर्षांची तुरुंगवार आणि ५० हजार रुपयांची शिक्षा कायम ठेवली. प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यावेळी, या शिक्षेला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण या न्यायालयाने सुद्धा प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत कोकाटेंच्या अडचणी कायम ठेवल्या. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्देशानुसार कोकाटेंच्या अटकेचा वॉरंट गुरुवारी दुपारी काढण्यात आले आणि त्यानंतर नाशिक पोलीस सायंकाळी ४ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, त्याआधीच प्रकृती अस्वस्थाचे कारण पुढे करत माणिकराव कोकाटे हे मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती झाले. त्यानंतर त्यांच्यावर सध्या लीलावतीमध्ये उपचार सुरू असून आज शुक्रवारी (ता. 19 डिसेंबर) त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे ज्यामुळे आज कोकाटेंच्या अटकेची शक्यता कमी वाटत असल्याचे सांगितले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




