अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेला मतदार यादी करण्याचे निर्देश सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यानुसार आता बँक प्रशासनाकडून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसाट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार असून त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही सहकारी संस्थांच्या निवडणूका गेल्या वर्षभरापासून रखडल्या होत्या. तर काहीची प्रक्रिया सुरू होवून ती मध्येच थांबवण्यात आली होती. आता या सर्व निवडणूका पूर्ण करण्याचे आदेश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला राज्य शासनाने स्थगिती दिली होती. मात्र नुकतीच ही स्थगिती उठविण्यात आल्याने आता जिल्ह्यात जिल्हा बँकेसह मुळा, लोकनेते मारूतराव घुले, वृद्धश्वेर या तीन सहकारी साखर कारखाना व 153 सेवा सोसाट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत 20 फेब्रुवारीलाच संपुष्टात आली आहे. ही मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होते. मात्र, राज्य शासनाने यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. परंतू आता या निवडणुका होणार असून त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागा असून त्यात 14 जागा या सेवा सोसायट्यांसाठी आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना आता मतदानासाठी ठराव द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठराव कोणला मतदान करण्याचा अधिकार देते. यावर निवडणुकीचे गणित ठरते. सहकार खात्याने बँकेला मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. सोसायट्यांना ठराव देण्यासाठ महिनाभराची मुदत राहणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक की कर्जमाफी आधी
जिल्हा बँकेसह नगर जिल्ह्यातील अ व ब वर्गातील 157 सहकारी संस्थांच्या निवडणूका पूर्ण करण्याचे आदेश सहकार विभागाने काढले आहेत. यात जिल्हा बँकेसह तीन बड्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. तसेच ब वर्गातील 153 संस्थांचा समावेश आहे. जिल्हा बँकेत सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी माहिती देण्याची धावपळ सुरू असून त्यातच आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेत निवडणूक जाहीर होणार की कर्जमाफी हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुळा, ज्ञानेश्वर आणि वृद्धश्वेर कारखान्यांची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार
जिल्ह्यात तीन सहकारी साखर कारखान्यांची मुदत संपली असून त्यांची निवडणुकी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील आठवड्यापासून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मुळा सहकारी साखर कारखाना, लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना, वृद्धश्वेर सहकारी साखर कारखाना याची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. मुळाची मुदत 18 जानेवारी, ज्ञानेश्वरची मुदत 20 जानेवारी तर वृद्धश्वेरची मुदत 28 जानेवारी रोजी संपुष्टात आली आहे. संस्था सभासद व व्यक्तिगत सभासद हे दोन मतदान या कारखान्यांसाठी आहे. पुढील आठवड्यात मतदार यादी करण्याचे सांगण्यात येणार असून त्यासाठी 25 दिवसांचा कालावधी राहणार आहे.





