नाशिक | प्रतिनिधी Nashik
चौथ्या विश्व मराठी संमेलनाला मराठी बोलींच्या महोत्सवा पासून सुरुवात झाल्यानंंतर साहित्यप्रेमी, कला रसिक व लेखकांच्या स्वागतासाठी कुसुमाग्रज नगरी सज्ज झाली आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार (दि.27) रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, महाराष्ट्र शासन विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साहित्यप्रेमीनी, कला रसिकांनी संमेलनास उपस्थित राहवे, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन ठाकरे यांनी केले आहे.
27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार्या संमेलनासाठी कविवर्य कुसुमाग्रज नगरी सज्ज झाली असून कुसुमाग्रज नगरीमध्ये विविध मंच उभारण्यात आले आले. पुढील चार दिवस या नगरीमध्ये विविध कार्यक्रम पार पडणार असून कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिमान मराठी, अभिजात मराठीचा जल्लोष होणार आहे. संमेलनाची सुरुवात सकाळी 9 वाजता शोभा यात्रेने होईल. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून हि शोभायात्रा निघेल आणि शोभायात्रेचा समारोप कुसुसमाग्रज नगरी येथे होईल. मुख्य सभामंडपासह ग्रंथ प्रदर्शन दालन, तसेच मराठी भाषेसह महाराष्ट्राची महती सांगणारी ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतीके उभारण्यात आलेली आहे.तसेच ग्रंथ प्रदर्शनामध्ये 150 ग्रंथ प्रकाशकांचे स्टॉलस उभारण्यात आले आहे.
संमेलनात मराठी भाषेचे संवर्धन, नव्या पिढीत भाषेबाबत अभिमान निर्माण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. जागतिक पातळीवर विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणून मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा ठरविणे हे संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संमेलनादरम्यान विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्याने, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला आणि लोकपरंपरेचे वैभव या माध्यमातून अधोरेखित केले जाणार आहे. तसेच परदेशातील मराठी संस्थांशी संवाद साधत मराठीच्या डिजिटल भविष्यासंदर्भात आणि अनुवादाच्या माध्यमातून मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचविण्याबाबत विचारमंथन होणार आहे.
संमेलनात 20 बाय 10 फुटाची 33 दालने
संमेलनात पुस्तक प्रदर्शन मंडपात 20 बाय 10 फूट आकाराची 33 दालने उभारण्यात आली आहे. यात महाज्योती, सारथी, आर्टी, बर्टी या संस्थांच्या स्टॉलमधून रोजगार संधी, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, अर्थसहाय्य यावर जागृती केली जाणार आहे.
जीवन गौरव,विशेष पुरस्कारांचे वितरणसंमेलनात पहिल्या दिवशी डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर शांतिब्रह्म, गुरूवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनाच्या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.





