Friday, August 28, 2026
HomeनगरAhilyanagar : कॉक्रोच कार्यकर्त्यांची पहिली धडक शाळांवर

Ahilyanagar : कॉक्रोच कार्यकर्त्यांची पहिली धडक शाळांवर

जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक || संघटनात्मक बांधणीचे नियोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

देशभर गाजत असलेल्या युवा कॉक्रोच जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातही आगमन झाले असून ही नगरची कॉक्रोच पार्टी जिल्ह्यातील सरकारी शाळांवर पहिली धडक देणार आहे. यात संबंधीत शाळामध्ये पायाभूत सुविधा व शैक्षणिक दर्जा याची तपासणी करणार आहेत. स्कूल ठीक करो… अभियान राबवण्यासह दुसरीकडे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार आहे. यानिमित्ताने देश गाजवणारी कॉक्रोच जनता पार्टी आता जिल्ह्यातील क्षेत्राला हादरे देण्याच्या तयारीत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था त्यांच्या अजेंड्यावर आहे.

- Advertisement -

दरम्यान, मागील आठवड्यात शालेय शिक्षण मंत्र्यासोबत कॉक्राचे जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झालेली असून त्यांनी कॉक्रोच यांच्या माध्यमातून पुढे येणार्‍या समस्या सोडवण्यासाठी अधिकचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या महाराष्ट्र दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच नगरमध्ये झाली. या बैठकीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीने यापूर्वी देशभरात राबविलेल्या विविध आंदोलनांना मिळालेले यश, त्या आंदोलनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्रश्न मांडण्याची पद्धत, जनतेचा सहभाग वाढविण्याचे नियोजन तसेच भविष्यातील जनआंदोलने अधिक प्रभावी व संघटित पद्धतीने राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

ऑर्गनायझेशन जॉईंट सेक्रेटरी अक्षय शिंदे, वेस्ट झोन को-ऑर्डिनेटर डॉ. नितीन दिघे व अ‍ॅड. जयसिंग शेरे यांच्यासह क्षितिज पगार, प्रज्वल कसबे, सागर स्वामी, प्रथमेश दरेकर, सुशील शेळके, महेश सटाले, सागर शेळके, प्रवीण फराटे, प्रथमेश दरवडे उपस्थित होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या जिल्हा शाखेद्वारे सरकारी शाळा अजेंड्यावर घेण्यात आल्या आहेत. स्कूल ठीक करो अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे ठरवण्यात आले. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सरकारी शाळांचे सर्वेक्षण व ऑडिट करण्याचे नियोजन करण्यात आले.

शाळेची इमारत, वर्ग खोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, पंखे, प्रकाश व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा, परिसराची स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, खेळाचे मैदान तसेच इतर मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची नोंद घेण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळानिहाय माहिती संकलित करून त्यामधील त्रुटी व आवश्यक सुविधांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी व प्रशासनाकडे सादर करून शाळांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्रश्न मांडले जाणार आहेत. केवळ समस्या मांडण्याऐवजी प्रत्येक शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून पुराव्यांसह व वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे प्रश्न मांडण्याची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

50 शाळांची पाहणी पूर्ण
नगर जिल्ह्यात एकट्या जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा आहेत. यातील बहुतांशी शाळांपर्यंत पोहचून त्यांच्या समास्य जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक शाळेत असणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांची भेट घेवून त्यांना सोबत घेवून प्रत्येक शाळेत जावून त्या ठिकाणी असणारे प्रश्न आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. समोर येणारे प्रश्न आणि आणि समस्या एका फॉर्मवर भरून त्या शिक्षण मंत्र्यांना सादर करणार आहेत. या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी अधिकच्या निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मान्य केले असल्याचे नगर कॉक्रोच जनता पार्टीकडून सांगण्यात आले.

पक्षाची संघटनात्मक बांधणी होणार
बैठकीमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवरही चर्चा करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, स्थानिक पातळीवर जबाबदार्‍या निश्चित करणे आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेसोबतच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून ते योग्य पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि त्यासाठी लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणे, हा पक्षाच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी संबंधित प्रश्न, सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधा आणि प्रशासनाच्या पातळीवर प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचे नियोजन करण्यात आले.

ताज्या बातम्या

Newasa : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला

0
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa नेवासा शहरात नगरपंचायत समोरील फळ विक्रीच्या हातगाड्याचे स्थलांतरण करण्यावरून प्रशासकीय मोहिमे दरम्यान तणाव निर्माण झाला. दरम्यान, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या...