Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विनापरवानगी रुफ टॉपवर मद्यविक्री (Liquor Sale) करणाऱ्या आणि २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मद्य विक्री करणाऱ्या चार परवानधारक मद्यविक्रेत्यांचे परवाने महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत. या व्यावसायिकांकडे अनियमितता आढळल्याचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्याकडे सादर केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

पुण्यातील पोर्श कार हिट अँन्ड रन अपघातानंतर अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) जिल्ह्यात तपासणी मोहिम राबवली. त्यात शहरातील अनधिकृत रुफ टॉप हॉटेलची तपासणी केली असता दोन ठिकाणी विनापरवानगी मद्यविक्री केली जात असल्याचे आढळून आले. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना मद्य विक्री करता येत नसतानाही काही विक्रेते सर्रास मद्यविक्री करत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे मद्यविक्री करणाऱ्या चार आस्थापनांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. तर, सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये राज दरबार हॉटेलमध्ये बनावट मद्य आढळून आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील मद्यविक्रेत्याने ‘ड्राय डे’ असूनही मद्य विक्री केल्याने त्याचा परवाना १५ दिवसांकरीता निलंबित आहे.

या बारचे परवाने निलंबित

पाथर्डी फाटा येथील हॉटेल गारवा रेस्टॉरंट व बार, कमोदनगर येथील हॉटेल हेमराज रेस्टॉरंट व बार, उपनगर परिसरातील द केव्हज आणि कॉलेजरोड येथील हॉटेल न्यू इंटर ड्रॅगन या चार व्यावसायिक आस्थापनांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. तो अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे सादर केला. यानंतर चारही आस्थापनांचे परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या