Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखबदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याचा महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य प्रयत्न!

बदलाची सुरुवात स्वत:पासून करण्याचा महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य प्रयत्न!

टिंब जरी बेचके एवढे

परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे!

- Advertisement -

शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी!

असे संत ज्ञानेश्वरांनी (Saint Dnyaneshwar) म्हटले आहे. शब्दांच्या शक्तीची आणि व्याप्तीची तुलना ज्ञानेश्वरांनी सुर्यबिंबाशी केली आहे. ज्ञानेशांच्या या ओवीचा बोध राज्यसरकारनेही लक्षात घेतला असावा असे नुकत्याच निघालेल्या आदेशावरुन वाटते.

एक मे रोजी जागोजागी होणार्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात काय बोलावे आणि काय टाळावे याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना स्पष्ट शब्दात सरकारने सर्व पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्र दिनी प्रत्येक पालकमंत्री (Guardian Minister) त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. जमलेल्या जनतेला उद्देशून भाषणे करतात. त्या भाषणात पालकमंत्र्यांनी राजकीय मुद्यांवर आधारित भाषण करु नये. पालकमंत्र्यांनी त्यांचे भाषण महाराष्ट्र दिवसाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मान्यवरांच्या कर्तृत्वाचे वर्णन, बलिदान केलेल्या हुतात्म्यांच्या पराक्रमाची गाथा या मुद्यांपुरते मर्यादित ठेवावे, या कार्यक्रमाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर केला जाऊ नये आणि कोणत्याही अधिकार्‍याने भाषण करु नये अशा मार्गदर्शक सूचना त्या आदेशात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी वामनराव निंबाळकर (Senior poet Wamanrao Nimbalkar) म्हणतात, तेच सध्या समाजाच्या अनुभवास येत आहे. ‘शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुद्धा’, असे वामनराव म्हणतात.

सध्याच्या परिस्थितीत ‘शब्द हेच शस्त्र’ झाल्याचा अनुभव जनतेला ठायीठायी येत आहे. नेतेमंडळी आणि त्यांचे बगलबच्चे वापरत असलेल्या शब्दांमुळे आणि त्या शब्दांमागे सहेतूकपणे दडवलेल्या अर्थामुळे समाज विघटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे की काय असे वातावरण तयार होत आहे. किंबहुना झाले आहे. परस्पर सौहार्द, परस्पर विश्वास असे शब्द निकाली निघाले आहेत. त्या शब्दांची जागा विश्वासघात, पाठीत खंजीर खुपसणे अशा अनेक शब्दांनी घेतली आहे. अशा बर्‍याच उणीवा शासनाच्या लक्षात आल्या असाव्यात. त्या उणीवा दूर करण्याचे प्रयत्न राज्यसरकारने जाणीवपूर्वक सुरु केले असावेत. नेत्यांची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या, त्यांच्या भाषणांची दिशा काय असावी याबद्दल सूचना करण्याचा हा कदाचित पहिलाच प्रयत्न असावा. कार्यक्रम कोणताही असो, राजकीय उखाळ्यापाखाळ्या, उणीदुणी, शाब्दिक कुरघोड्या आणि कोपरखळ्या यावरच सध्या नेतेमंडळींच्या भाषणात मुख्य भर जाणवतो. याला कोणताही राजकीय पक्ष आणि त्याचे नेते अपवाद नाहीत. दिसले व्यासपीठ की ठोक राजकीय भाषण असाच बहुतेक नेत्यांचा खाक्या बनला असावा का? असे वाटणारी परिस्थिती सर्वत्र अनुभवाला येते. या राजकीय साठमारीच्या भाषणांनी किती खालची पातळी गाठली आहे हे लोक दिवसाचे चोवीस तासही अनुभवत आहेत. स्वत:ची बुद्धी चालत नाही त्यामुळे रामायण अणि महाभारतासारख्या विश्ववंद्य ग्रंथातून दाखले शोधून भाषण सजविण्याचा उद्योग सध्या खूपच विस्तारला आहे.

‘तुम्ही सरी घातली मग आम्ही दोरी घालतो’ ही म्हण सध्याच्या राजकीय वातावरणाला चपखल लागू पडते. नेत्यांच्या भाषणातून केवळ गैरसमजच निर्माण होतात. किंबहुना हेतुपुरस्सर निर्माण केले जातात. म्हणून जिथे संधी मिळेल तिथे भाषण ठोकताना निदान सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी काय मर्यादा पाळाव्यात याचे मार्गदर्शन या नव्या सूुचनेतून स्पष्टपणे सांगितले आहे. हा आदेश किती पाळला जाईल हे लवकरच स्पष्ट होईल. तथापि उणीवांची जाणीव सरकारी पातळीवर झाली आहे हे यातून लक्षात येते.

कोणत्याही चांगल्या बदलाची सुुरुवात स्वत:च्या घरापासून करावी असे म्हणतात. राज्य सरकारने अशा जाणवलेल्या उणीवा दुरुस्त करण्याची सुुरुवात पालकमंत्र्यांना सूचना देऊन केली ही दिलासादायक सुरुवात वाटते.

- Advertisment -

ताज्या बातम्या