Saturday, November 23, 2024
Homeनगरतत्कालीन आयुक्त जावळेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

तत्कालीन आयुक्त जावळेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

लाच प्रकरण || जिल्हा न्यायालयाचा निर्णय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नगर जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. बुधवारी सकाळी सुमारे दीड तास झालेल्या युक्तिवादानंतर सायंकाळी जिल्हा न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी जामीन अर्ज नामंजूर केला. गुन्हा दाखल झाल्यापासून जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे दोघेही पसार आहेत. जावळे यांनी अ‍ॅड. सतीश गुगळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेण्यात आली. अ‍ॅड. अभिजीत पुप्पाल यांनी फिर्यादीतर्फे युक्तिवाद केला.

- Advertisement -

सरकार पक्षाकडून अ‍ॅड. अनिल घोडके यांनी युक्तिवाद करत अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली. जावळे यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झालेला आहे, त्यांचा मोबाईल फोन हस्तगत करून त्याचा तपास करायचा आहे, त्यांना ट्रॅपची माहिती कुणाकडून मिळाली, यात आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास करायचा असल्याने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद त्यांनी केला. नगर महापालिकेत नवीन आयुक्त नियुक्त झाले आहेत. त्यामुळे जावळे हे पुन्हा महापालिकेत हस्तक्षेप करू शकत नाहीत. 19 जूनला पैशांची मागणी नोंदवण्यात आली, रक्कमही निश्चित झाली. त्यामुळे पुन्हा 20 जूनला व्हेरिफिकेशन करण्याची गरज काय, जावळे यांच्या विरोधात पुरावा तयार करण्याचा व त्यांना यात गोवण्याचा उद्देश यातून स्पष्ट होतो. त्यातही जावळे यांनी बोलून घ्या म्हटले आहे, त्याचा तर्क वेगळा काढण्यात आला.

फाईल मंजूर झाली असतानाही फिर्यादीने पैशांचा विषय काढला. त्यावर आयुक्त जावळे यांनी तुमची फाईल मंजूर झाली आहे, विषय संपला आहे, इतर चर्चा करण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे. आयुक्तांना ट्रॅपची माहिती सुरूवातीला असती, तर देशपांडे सुट्टीवर गेले तेव्हाच तेही सुट्टीवर गेले असते. मात्र ते इथेच होते. त्यांना विनाकारण यात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा संशय आल्याने ते नंतर सुट्टीवर गेले. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी कोणतेही ठोस कारण नाही, ते तपासाला उपलब्ध होऊ शकतात, असा युक्तिवाद अ‍ॅड. सतीश गुगळे यांनी केला. त्यावर न्यायालयाने सायंकाळी निर्णय देत जामीन अर्ज नामंजूर केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या