जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
सोलर पावर प्लांट या कंपनीत वॅाचमनचे हातपाय बांधुन चोरी (Theft) करणारी आंतरजिल्हा टोळी खर्डा पोलीसांना (Kharda Police) जेरबंद केली आहे. या टोळीकडून 9 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि 17 फेबु्रवारी रोजी पहाटेच्या सुमारास जामखेड तालुक्यातील दिघोळ फाटा येथील सोलर पॉवर प्रा.लि. या कंपनीतील सिक्युरीटी गार्डला अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने मारहाण (Beating) करून त्याचे हातपाय बांधुन कंपनीतील 6 लाख 75 हजार रूपये किंमतीची कॉपर व डीसी केबलची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात (Kharda Police Station) गुन्हा दाखल करण्यात होता. या प्रकरणाचा तपास करत असतांना दि.28 फेबु्रवारी रोजी पोलीसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी हे चोरी (Theft) करण्याच्या उद्देशाने धानोरा शिवार ता. आष्टी जि.बीड रोडने जामखेडच्या (Jamkhed) दिशेने येत असतांना खर्डा पोलीस व जामखेड पोलीसांच्या संयुक्त पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले.
सागर गोरक्ष मांजरे (रा. अहिल्यानगर), वाहिद काहीद खान (रा. आंबावली ठाणे), सिराज मियाज अहमद (रा. आंबवली ठाणे), टेम्पो चालक या आरोपींना अटक करण्यात आली असून यातील विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यातील अमोल चांदणे (रा. अहिल्यानगर), बद्री आलम (रा.अबोवली ठाणे), वाहीद (पुर्ण नाव माहीत नाही) हे तीन आरोपी फरार आहेत. सागर मांजरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यामध्ये 28 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींकडुन चोरी केलेला माल व एक पिकअप टेम्पो असा एकुण 9 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमालासह दोन कोयते, पाच स्टीलचे पान्हे, एक लोखंडी पक्कड, चार ब्लेड व चार मोबाईल असे दरोड्याचे (Robbery) साहित्य पोलीसांनी हस्तगत केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदशनाखाली खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, विष्णु आवारे, शशी म्हस्के, पंडित हंबर्डे, बाळु खाडे, गणेश बडे, धनराज बिराजदार, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार विश्वास बेरड, रोहीत मिसाळ, अतुल लोटके यांनी केली असुन सापळा कारवाईसाठी जामखेड पोलीस ठाण्याचे (Jamkhed Police Station) सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, अंमलदार प्रविण इंगळे, देवा पळसे, कुंदन घोळवे, हनुमंत आडसुळ यांनी मदत केली.