संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील साकुर येथे प्रवीण बारच्या पाठीमागे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात 10 हजार रुपये रोख व मटका खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी 15 जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकुर येथील प्रवीण बारच्या पाठीमागे मटका नावाचा जुगार चालत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरुन पोलीस नाईक दत्तात्रय मेंगाळ, पोलीस कॉन्स्टेबल बापुसाहेब हांडे, घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. लाड, श्री. बीरे या पोलीस पथकाने सदर ठिकाणी बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता छापा टाकला.
सदर छाप्यात वसीम हुसेन पटेल, अलीम हुसेन पटेल, सचीन शिवाजी पेंडभाजे, दिलावर रहीमत इनामदार, मनोज सुरेश लोळगे, अब्दुल दिलावर मोमीन, धोंडीभाऊ गोविंद भडांगे, सुभाष रेवजी सोनवणे, चौरंगनाथ गोपाळा भुतांबरे, शाहरुख राजु पठाण, भाऊसाहेब खेमा गावडे (सर्व रा. साकुर, ता. संगमनेर), वनेष भिमा गायकवाड (रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर), दत्तात्रय लक्ष्मण अष्टेकर (रा. मांडवे बुद्रूक, ता. संगमनेर), अनिस फकिरा शेख (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी), शांताराम कुमाजी काळे (रा. शेडेवाडी, ता. संगमनेर) हे मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्याकडून 10 हजार 80 रुपये व कल्याण मटका नावाचे जुगाराचे साहित्य साधने रोख रकमेसह पोलिसांनी जप्त केले आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील 15 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 2/2020 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. एस. वायाळ हे करत आहे.