Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमसाकूर दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

साकूर दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील साकूर येथील कान्हा ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकल्याची घटना सोमवारी (दि.11) दुपारी घडली होती. दोन दुचाकींवरून आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करत हा दरोडा टाकला होता. यामध्ये त्यांनी 52 लाख 41 हजार 600 रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. त्यांनतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर पाठलाग करून दोघा दरोडेखोरांना मंगळवारी (दि.12) सकाळी पारनेर हद्दीत पकडले असून तिघेजण अद्याप पसार आहेत.

- Advertisement -

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की साकूर बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या संकेत सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्समध्ये सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाच अनोळखी इसम आले. यापैकी तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम असा एकूण 52 लाख 41 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेची माहिती काहींनी घारगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यानंतर दुकानाची पाहणी करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेऊन दरोडेखोर ज्या दिशेने गेले त्या दिशेने त्यांचा कसून शोध घेत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. श्वान व ठसेतज्ज्ञ पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान, दरोडेखोर पारनेर हद्दीतील शिक्री गावच्या दिशेने पळाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामस्थांसह पोलिसांनी रात्रभर दरोडेखोरांची शोधमोहीम सुरू केली. अखेर मंगळवारी सकाळी डोंगरदर्‍यांमध्ये पाठलाग करून अक्षय बाळासाहेब वावरे (वय 24) व स्वप्नील किशोर येळे (वय 22, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) या दोघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. यानंतर या दरोडेखोरांकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या असून आणखी तिघा दरोडेखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या