नाशिक l प्रतिनिधी Nashik
शहरात वाढत्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना निर्भयपणे आणि निष्पक्षपणे कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असून, या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.ते नाशिक मध्ये शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या आढावा मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
‘कोणाच्याही गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाही’
शहरात आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना मोकळे हात देण्यात आले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजप, महायुती, विरोधक किंवा कोणताही पक्ष असो गुन्हेगारीला कुणाचाही राजकीय आश्रय मिळू देणार नाही. जो कुणी गुन्हेगारीत गुंतलेला असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, पोलिस आयुक्त नाशिकमध्ये ठोस कारवाई करत आहेत आणि शासनाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. गुन्हेगारीला राजकीय संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, तरी तो हाणून पाडला जाईल असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
‘शंभर प्लस’चा नारा नाशिकमध्ये
राजकीय रणनीतीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आगामी निवडणुका महायुतीकडूनच लढवल्या जाणार आहेत. काही ठिकाणी महायुतीतील पक्षांमध्ये तुल्यबळ उमेदवार असतील, तेथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. पण नाशिकमध्ये ‘शंभर प्लस’ हा नारा महायुतीचाच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर संघटन बळकट करून मतदारांपर्यंत पोहोचावे. जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांवरच आपले राजकारण आधारित करण्याचे निर्देशही दिले
उत्तर महाराष्ट्रात भाजपचा संघटनात्मक आढावा
उत्तर महाराष्ट्रातील मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा आणि सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी विविध जिल्ह्यांतील निवडक पदाधिकारी, जनप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उत्तर महाराष्ट्र हा भाजपसाठी नेहमीच मजबूत किल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीत येथे चांगले यश मिळाले. आगामी निवडणुकांत त्याहूनही मोठे यश मिळेल, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.




