Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसंभ्रम कायम, शिवजयंतीवरून मंडळे आक्रमक; शासनाचे निर्देश पाळण्याचे पोलीसांचे आवाहन

संभ्रम कायम, शिवजयंतीवरून मंडळे आक्रमक; शासनाचे निर्देश पाळण्याचे पोलीसांचे आवाहन

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबत शिवप्रेमींमध्ये संभ्रम आहे. तर पोलीस शासनाच्या निर्देशांचे पालन करा म्हणत गर्दीस व मिरवणुकीस नकार देत असल्याने वाद अधिक चिघळला आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज जयंती दर वर्षी जल्लोषात साजरी केली जाते. परंतु, यंदाच्या उत्सवावर करोना संसर्गाचे सावट आहे. शिवजयंतीचा उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असून, करोना संसर्गाला अटकाव करण्यात आरोग्य यंत्रणांना बर्‍यापैकी यश आल्याने आणि बाजारपेठांमधील जनजीवन पूर्वपदावर आल्याने यंदा जयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी शिवजन्मोत्सव मंडळांनी तयारीदेखील सुरू केली.

शहरभर पदाधिकार्‍यांचे फलक झळकत आहेत. अनेक मंडळांनी वर्गणीही गोळा केली आहे. तसेच यात काही विघ्न येऊनये यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांनाही मिरवणुकीची परवानगी मिळण्याबाबत साकडे घालण्यात आले.

नवीन मंडळांना परवानगी देण्यात येणार नाही. परंतु, शहरातील पारंपरिक मिरवणुका व कार्यक्रमांना परवानगी देण्यास प्राधान्य राहील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले होते. नियमांचे पालन करावे आणि अधिक गर्दी होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी, अशा सूचनाही भुजबळ यांनी मंडळांच्या बैठकीत केल्या होत्या.

परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने शिवजयंती सोहळा साजरा करण्यावर काही निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवजयंती सोहळ्यात पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीस परवानगी नसल्याचे पोलिसांकडून मंडळांना सांगण्यात आले.

यामुळे संतप्त झालेल्या शिवमंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, पण शिवजयंतीची मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढणारच, असा पवित्रा घेत शुक्रवारी सीबीएस येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलनही केले. परंतु शासनाचे निर्देश पाळून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीसांनी केले असल्याने शविप्रेमींमध्ये मोठी नाराजगी आहे.

सरकारने शिवजयंती साजरी करायला बंदी घातलेली नाही. फक्त त्यामध्ये किती व्यक्ती सहभागी व्हाव्यात याबाबत मार्गदर्शन केले आहे. कोव्हिड अजून संपलेला नाही हे लक्षात घेऊन मंडळांनी कार्यक्रम घ्यावेत, हा या निर्देशांचा उद्देश आहे. राज्य सरकारचे निर्देश प्राप्त झाले असून, त्याचे पालन शहरातील सर्व शिवजयंती मंडळांनी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहर पोलिसदेखील शिवजयंतीच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करतील.

दीपक पांडेय, पोलिस आयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या