सार्वमत
मुंबई – महाराष्ट्रातील सध्याचं सरकार हे आमचं सरकार नाही तर शिवसेनेचं आहे असं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याशी बोलताना म्हटलं आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे चव्हाण हे नाराज असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. राज्यात करोनाचं थैमान सुरू असताना काँग्रेसचे मंत्री कुठेच दिसत नाही असं म्हटलं जात असतानाच हे वक्तव्य आल्याने सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यामधलं ते संभाषण असल्याचं बोललं जात आहे. तो कार्यकर्ता चव्हाणांना विकास निधी देण्याबाबत विनंती करत होता. त्यावर बोलताना सध्याचं सरकार हे आमचं सरकार नाही तर शिवसेनेचं सरकार आहे असं चव्हाण म्हणाले. त्याच बरोबर मी सरकारमध्येही नाही त्यामुळे नक्की आश्वासन देऊ शकत नाही. फक्त शिफारसपत्र देऊ शकतो असंही ते म्हणाले.
करोनामुळे परिस्थिती बिकट आहे, सगळा विकासनिधी सरकारने परत घेतला आहे. असंही चव्हाणांनी सांगितलं.
भविष्यात तुम्हाला संधी आहे असं कार्यकर्त्याने म्हटल्यावर चव्हाण म्हणाले, यावेळी काही संधी दिली नाही असं म्हणत त्यांनी फोन ठेऊन दिला. स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने त्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना केला फोन केला होता. करोना
प्रादुर्भावाच्या काळात अलीकडेच पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं होतं की राज्यात नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याचं आढळते त्यावरही ते नाराज असल्याचे संकेत मिळाले होते.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 6 वी जागा लढण्याचा काँग्रेसचा आग्रह होता तर निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता. उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक न लढण्याचा निरोप बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवून काँग्रेसवर दबाव आणला होता.
अखेर करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे कारण देत काँग्रेसला 6 व्या जागेचा आग्रह सोडावा लागला होता. गेल्या मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभा जागांच्या निवडणुकीतही राज्यात पक्षावर अन्याय झाल्याची काँग्रेसची भावना होती. नितीन राऊत, नाना पटोले, सुनील केदार या काँग्रेस नेत्यांनीही काही दिवस आधीच सरकार मधील प्रशासन आणि दुय्यम वागणूक यावरून नाराजी व्यक्त केली होती.