Thursday, July 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात काँग्रेस कडून पदयात्रेचे आयोजन

सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात काँग्रेस कडून पदयात्रेचे आयोजन

अमेरिकासोबत केलेल्या व्यापार कराराला विरोध

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाच्या विरोधात ९ मार्च २०२६, सोमवार रोजी काँग्रेसच्या वतीने कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला जाणार आहे.

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्र देशोधडीला लागणार आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी व्यापारी करार हा मोठा आघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर सपशेल शरणागती पत्करली असून या करारामुळे भारतातील शेतमालाला भाव मिळणार नाही. परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढणार असल्याची भीती सपकाळ यांनी केली आहे.

केंद्रातील भाजप सरकारबरोबरच राज्यातील महायुतीचे सरकारही शेतकरी विरोधी असून गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणून शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला तीव्र विरोध आहे. पण सरकार मात्र या विरोधाकडे कानाडोळा करून त्यांच्या लाडक्या उद्योगपती मित्रासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.

भाजप सरकारच्या या जुलमी, अत्याचारी, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून त्यासाठी ९ मार्च रोजी कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली आहे.

दरम्यान, आदिवासी विशेष पदभरती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, घरकुल योजना या मागण्या या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे या यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी असून प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह हिंगोली जिल्हा काँग्रेस समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : मानधन घेऊनही कार्यक्रमाला दांडी; ‘या’ अभिनेत्रीला ...

0
नाशिक | Nashik कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारूनही ऐनवेळी पाठ फिरवणाऱ्या अभिनेत्रीला नाशिक जिल्हा ग्राहक (Nashik Consumer Court) तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. "मानधन...