Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

पंतप्रधान पीक विमा योजनेतील जाचक अटी आणि नुकसानीपोटी मिळणारी तुटपुंजी मदत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेला १० ऑगस्ट २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी मुदतवाढीबाबत माहिती दिली. आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.

राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार कोकण विभागातून १ लाख २ हजार ३३५, नाशिक विभागातून ३ लाख ३३ हजार ३८५, पुणे विभागातून ६ लाख ७ हजार ६६३, कोल्हापूर विभागातून २ लाख ४० हजार २५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३ लाख २५ हजार, लातूर विभागातून २ लाख ४२ हजार ८२६, अमरावती विभागातून ६ लाख ९१ हजार ९७३ आणि नागपूर विभागातून ४ लाख ५३ हजार ३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे, अशी माहितीही भरणे यांनी दिली.

दरम्यान, पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

‘पंतप्रधान पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट तसेच हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन अर्ज करावा’
दत्तात्रय भरणे – कृषी मंत्री

ताज्या बातम्या

Nashik News : दुर्दैवी घटना! वडील-मुलासह नातूचा धरणात बुडून मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon तालुक्यातील कजवाडे (Kajwad) लगत असलेल्या सातवडी तलावात (Satvadi Lake) बुडून पिता-पुत्रासह नातूचा अंत झाल्याची घटना रविवारी (दि.४) दुपारी दीड वाजेच्या...