शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त (Guru Purnima Festival) देश विदेशातून साई समाधीचे दर्शन (Sai Samadhi Darshan) घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांना गुरुदक्षिणा म्हणून 7 कोटी 81 लाखांचे दान देणगी (Donation) रुपी दिले आहे. साईबांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बुधवार 28 ते शुक्रवार 30 जुलै या तीन दिवसाच्या कालावधीत आयोजित केलेल्या गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये 7 कोटी 81 लाख 13 हजार 377 इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. देणगीमध्ये रोख स्वरुपात रुपये 2 कोटी 4 लाख 35 हजार 557 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली.
देणगी काऊंटरवर 1 कोटी 25 लाख 47 हजार 935 रुपये, पीआरओ देणगी 87 लाख 14 हजार, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी.डी. देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2 कोटी 7 लाख 84 हजार 701 रुपये, परकीय चलनाद्वारे 5 लाख 65 हजार 991 रुपये, सोने 1,125.570 ग्रॅम प्राप्त झाले असून त्याचे मुल्य रक्कम रुपये 1 कोटी 46 लाख 74 हजार 544 व चांदी 2,376.500 ग्रॅम प्राप्त झाली असून तीचे मुल्य रक्कम रुपये 3 लाख 90 हजार 649 असे आहे.
गुरूपौर्णिमा उत्सव (Guru Purnima Festival) कालावधीत साधारणतः 3 लाखाहून अधिक साईभक्तांनी (Sai Devotees) साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1 लाख 94 हजार 285 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा तर 39,611 अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. दर्शन रांगेत 1 लाख 65 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत 71 लाख 7 हजार 360 रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून प्राप्त झाले.
उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा (Sai Baba) भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या 39 पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.




