Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकबनावट सेवकांबरोबर जि.प.सेवकांचे कनेक्शन

बनावट सेवकांबरोबर जि.प.सेवकांचे कनेक्शन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील योजनांच्या नावाखाली लाभार्थ्यांना बनावट सेवकांनी कोटयवधींचा गंडा घातला आहे.

- Advertisement -

या प्रकरणात आता जिल्हा परिषदेचे सेवकांचे कनेक्शन असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पोलिस तपासात सेवकांचे संभाषण हाती लागले असल्याचे वृत्त आहे. तसेच व्हाट्सअ‍ॅपवर समाजकल्याण विभागातील लाभार्थ्यांच्या यादीची देवाणघेवाण झाली असल्याचे समजते. यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने पोलिस यंत्रणेकडे झेडपी संदर्भात माहिती मागविली आहे.

समाजकल्याण विभागातील वैयक्तिीक लाभाच्या योजनांच्या नावाने लाभार्थ्यांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. या बनावट सेवकांनी केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही तर कृषी, महसूल विभागातील योजनांच्या नावानेही ग्रामस्थांना लुबाडल्याचे समोर आले आहे.

तसेच राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या योजनांचा फायदा या या सेवकांनी उठवला आहे. चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जिल्हा परिषदेत येऊन समाजकल्याण विभाग व ग्रामपंचायत विभागातील अधिकाऱ्यांकडून जबाब लिहून घेतले. तसेच गेल्या तीन वर्षात समाज कल्याण विभागाने मंजूरी दिलेल्या सर्व लाभार्थ्यांची यादीची मागणी पोलिसांनी केली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजय पंडित व केशव कुऱ्हाडे या दोघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून यातील फरार संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांचे छापासत्र सुरूच आहे. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पोलिस तपासात अनेक गंभीर बाबी पुढे येत आहेत.

पोलिसांनी संबंधित आरोपींचे मोबाईल संभाषणाची तपासणी केली असता यात जिल्हा परिषदेतील सेवकांशी झालेले संभाषण हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सदर सेवकांशी व्हाटसअ‍ॅपव्दारे झालेले चॅटींगही पोलिसांच्या हाती लागले असल्याचे कळते. यात लाभार्थ्यांची यादीची देवाण-घेवाण होऊन चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात सेवकांचा सहभाग असल्याचा संशय यापूर्वीच सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.

शिक्के करणारांना नोटीस
लाभार्थ्यांची फसवणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के तयार करण्यात आलेले आहेत. तसेच शासकीय ओळखपत्र व पावत्यांची देखील छपाई करण्यात आली आहे. पोलिसांना संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्के तयार करणारांना नोटीस बजावण्यात आली असून कोणालाही पाठीशी घालत नसल्याचे सहाय्यक निरीक्षक राजपूत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या