संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे असलेल्या चाँदशहावली दर्ग्यावरील घुमटाचे बांधकाम सुरू आहे. काम सुरू असताना बुधवारी (दि.18) दुपारी या घुमटाचा काही भाग कोसळून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की मांडवे बुद्रुक येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या चाँदशहावली बाबांचा दर्गा आहे. त्याच्या घुमटाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामामध्ये योग्य सिमेंट अथवा काँक्रिट, स्टीलचा वापर न केल्यामुळे बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे घुमट कोसळून सुभाष तुकाराम नरवडे (रा.बारट, ता. मुतखेड, जि. नांदेड) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बालाजी मारुती गुतवड (रा.बारट, ता. मुतखेड, जि. नांदेड), अनिल गोविंद तिरवड (रा.घोडत, ता. कन्नड, जि. नांदेड) व अनिल चुडामण लोणी (रा.बारट, ता. मुतखेड, जि. नांदेड) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींवर सध्या संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दीपक दत्ता आललवाड (रा.बारट, ता. मुतखेड, जि. नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश धूळगंड (रा. मांडवे बु., ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे करत आहेत.