अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कंटेनरला कार आडवी लावून चालकाला मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल जबरीने चोरणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, तीन मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण सहा लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील पळशी फाटा येथे शनिवारी (21 नोव्हेंबर) ही घटना घडली होती. महादेव वसंत कांबळे (वय 29, रा. चापोली, ता. चाकूर, जि. लातूर) हे कंटेनर घेऊन जात असताना संशयितांनी त्यांना कार आडवी लावून त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर चालक कांबळे यांना मारहाण करून त्यांच्याकडील 20 हजार रूपये रोख आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मालमत्तेविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, हा गुन्हा दत्तात्रय कळमकर याने साथीदारासह केल्याची माहिती समोर आली. तो पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे असल्याचे समजल्यानंतर पथकाने तेथे जाऊन दत्तात्रय बाळासाहेब कळमकर (वय 36, मूळ रा. पळवे बु., ता. पारनेर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार आदेश दिलीप गट (वय 26, रा. वडुले, ता. पारनेर) याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आदेश गट यालाही ताब्यात घेतले. दोन्ही संशयित आरोपींना जप्त मुद्देमालासह पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहेत.




