नाशिक | Nashik
नाशिक शहरात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरु असून धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील लहान मंदीरं पाण्याखाली गेली असून दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. गंगापूर धरणातून आत्तापर्यंत २०३० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातील पाण्याच्या आवकानुसार विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच दारणा धरणातून सुरु असलेला २१९६ क्युसेक्सचा विसर्ग वाढवून दुपारी ३ वाजता २४०४ ने वाढवून ४६०० क्युसेक्सने सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी पात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात येत आहे. अशी खबरदारीची सुचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ६३१० क्युसेक्सने विसर्ग
नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधुन ९४६५ क्युसेक्स ने विसर्ग हा संध्याकाळी ६ वाजता ३१५५ क्युसेक्सने वाढ करुन एकूण १२६२० क्युसेक्सने सोडण्यात आला आहे. सदर विसर्गाची टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
इतर धरणांमधून सुरु असलेला विसर्ग
कश्यपी – ३२० क्युसेक, मुकणे – ३६३ वालदेवी -१७४ क्युसेक, आळंदी – ८७ क्युसेक, भावली – ३८२ क्युसेक, भाम – ७६७ क्युसेक, पालखेड- ८५६ क्युसेक, चणकापूर – १७०६ क्युसेक , हरणबारी – १२१२ क्युसेक असा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




