Monday, May 6, 2024
Homeनगरठेकेदाराचा हलगर्जीपणा व अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे देवळाली-फॅक्टरी रस्त्याचे काम बंद

ठेकेदाराचा हलगर्जीपणा व अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे देवळाली-फॅक्टरी रस्त्याचे काम बंद

सोसायटी चौकात 14 ला सर्वपक्षीय धरणे आंदोलन । ठेकेदाराच्या मगरुरीमुळे काम रखडल्याने संताप

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – गेल्या वर्षभरापासून राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरापर्यंत श्रीरामपूर रस्त्याचे काम ठेकेदाराचा हलगर्जीपणा व अधिकार्‍यांची उदासीनता यामुळे रखडले आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याने दोन दिवसांत रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास शनिवार 14 डिसेंबरपासून देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत तहसीलदार व संबंधित अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर रस्त्यापर्यंतचे काम एका स्थानिक ठेकेदाराने अधिकार्‍यांच्या संगनमताने दुसर्‍याचे टेंडर मंजूर होऊनही जबरदस्तीने काम आपल्याकडे घेतले आहे. ज्याच्या नावावर टेंडर मंजूर झाले तो ठेकेदार आणि सध्या काम घेतलेला ठेकेदार यांच्या देवाण-घेवाणीच्या आर्थिक वादात अनेक दिवस या रस्त्याचे काम रखडले. त्यातून अधिकार्‍यांनी योग्य तो ‘अर्थ’पूर्ण मोबदला घेऊन दोघांची तडजोड करून दिली. त्यानंतर स्थानिक ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा खडी आणून टाकली. यात चार ते पाच महिन्याचा कालावधी लोटला. याच दरम्यान रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने टॅक्सी युनियनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी रस्त्याच्या कामाची सुरुवात करावी, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

आंदोलनच्या हिसक्याने ठेकेदाराने काही ठिकाणी खडी पसरून डांबर ओतले. त्यानंतर आजतागायत त्या रस्त्याचे काम बंद आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे छोटे- मोठे अपघात ही नित्याची बाब बनली आहे. कडा येथील गरीब कुटुंबातील पदवीधर तरुण विक्रम तावरे (कडा, जि. बीड) यास आपला जीव गमवावा लागला. दोन दिवसांपूर्वी देवळाली प्रवरा येथील एका दुचाकीस्वारास खड्डे चुकविण्याच्या नादात चारचाकी वाहनाने उडवून दिले. त्यात तो दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या कामाची नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे. मात्र, ‘अर्थपूर्ण’ संबंध असणार्‍या अधिकार्‍यांनी ठेकेदाराला 16 हजार रुपये प्रतीदिन दंड आकारण्याची नौटंकी केली. वास्तविक त्या स्थानिक ठेकेदाराने या कामाची 80 टक्के रक्कम आगाऊ घेतली असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे आता कामाचे पैसे अधिकार्‍यांच्या मेहेरबानीमुळे अगोदरच हातात पडल्याने त्या आडमुठ्या ठेकेदाराची कामाबाबत चालढकल सुरू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, दोन दिवसांत या रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, वैभव गिरमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित कदम, शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नगरसेवक शैलेंद्र कदम, आरपीयायचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, किशोर पंडित, संजय संसारे, युवक काँग्रेसचे कुणाल पाटील, बाबा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गणेश भांड, वसंत कदम, जावेद सय्यद, सचिन साळवे, शिवसेनेचे सुनील कराळे, संतोष चोळके, मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल डोळस, आदिवासी संघटनेचे राजेंद्र बर्डे, नानासाहेब बर्डे, विशाल बर्डे, वडार समाज संघटनेचे गंगाधर गायकवाड आदींसह कार्यकर्ते व अन्य नागरिक सहभागी होणार आहेत.

ठेकेदाराची कानउघाडणी करण्याची मागणी
रखडलेल्या कामाचा ठेकेदार हा स्थानिक व सक्रिय राजकारणी असल्याने स्थानिक नेतृत्वाचा आपणास आशीर्वाद असल्याने कितीही नंगानाच घातला तरी काहीच होऊ शकत नाही, या अविर्भावात वागत आहे. स्थानिक नेतृत्वाने याबाबत मौन पाळल्याने ठेकेदाराची मगरुरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या आडमुठ्या ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या संबंधित नेत्यांनी त्या ठेकेदाराची कानउघाडणी करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या