मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ८०% पेक्षा जास्त पाऊस झाला असून, १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या १००% पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकरी खरीप हंगामातील कामात व्यस्त असल्याने त्यांना निवडणुकीत भाग घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांमध्ये चिन्हांचे वाटप झाले आहे किंवा उच्च/सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, अशा संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सध्या सुरू असलेल्या ३ हजार १८८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांपैकी ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील २८५ संस्थांच्या निवडणुका या आदेशामुळे लांबणीवर पडल्या आहेत.





