Thursday, May 2, 2024
Homeनगर‘करोना’ मुळे यंदा अनेक जावयांचा ‘धोंडा’ खाण्यास नकार

‘करोना’ मुळे यंदा अनेक जावयांचा ‘धोंडा’ खाण्यास नकार

नेवासा बुद्रुक| Newasa| मोहन गायकवाड

दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मासाला यंदा 18 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असली तरी अनेक

- Advertisement -

जावयांनी यंदा ग्रामीण भागात करोनाचे मोठे सावट असल्याने ‘धोंडा’ खायला नकार दिला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अधिक मासाची (धोंडा) जावयांना आतुरतेने प्रतीक्षा असते. सासुरवाडीला जावयांचा नेहमीच स्वागत, सन्मान तर होतोच; पण अधिक मासातील सन्मान जरा रूबाब वाढवणारा असतो. मुलगी व जावयांची लक्ष्मी-नारायण स्वरूपात पूजा होते.

चविष्ट धोंडे खाऊ घातले जातात पण यंदा ग्रामीण भागात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने धडकी भरल्याने परजिल्हा, परराज्यांतील जावई यांनी यंदा गावी सासुरवाडीला येण्यास नकार कळवत असल्याने गावातील पारावर चर्चा रंगत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

हा महिना 18 ऑक्टोबरला संपणार आहे. अधिक मासात विविध धार्मिक कार्ये केली जातात. विशेषत: या काळात लेक-जावयांना मोठा मान असतो. अधिक मासात लक्ष्मी व नारायणाची आराधना केली जाते. लेक-जावयाची लक्ष्मी- नारायण स्वरूपात पूजा केली जाते. त्यासाठी दोघांना खास आमंत्रण दिले जाते.

त्यांची पूजा करतात. सोन्याचं लॉकेट व अंगठी तसेच अनारसे, बत्तासे, नारळ, सुपार्‍या देतात. ते सर्व चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेऊन दिवा व कुंकू लावून हे दान दिले जाते. पुरणाचा धोंडा केला जातो. काही जण हौशीने चांदी किंवा सोन्याचे धोंडेसुद्धा जावयाला देतात. साडी, कपडे सुद्धा देतात. धोंड्याचे हे महत्त्व असल्याने जावईबापू सासरी येतातच. मात्र खेडोपाडी या धोंड्यावर देखील करोना सावट बघायला मिळत आहे.

ग्रामीण भागात यंदा करोना महामारीमुळे तसेंच ओला दुष्काळ जाणवतं असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अनेकांनी धोंड्यासाठी सासुरवाडीला येण्यास नकार दिला आहे.

– दिलीप गायकवाड, पोलीस पाटील नेवासा बुद्रुक

धोंड्याचा महिना आला की जावयांना देण्यासाठी काही प्रमाणात सोने व चांदी खरेदीसाठी नेहमीचं गर्दी असते मात्र करोनाचे संकट असल्याने यंदा ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

– मनोज डहाळे, गोल्ड व्हॅल्यूअर

काहींनी लढविली अशी शक्कल

धोंड्याच्या दानाची रक्कम थेट जावयांच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच धोंड्याच्या निमित्ताने लेक, जावई, नातवंडे सारे येतात. यंदा मात्र, ग्रामीण भागात हे चित्रं पहावयास मिळणार नसल्याने गावातील कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या