Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनवीन वर्षात मनपाची बससेवा होणार सुरु

नवीन वर्षात मनपाची बससेवा होणार सुरु

नाशिक । प्रतिनिधी

करोनानंतर राज्यात एस. टी. महामंडळाची बससेवा ग्रामीण भागात सुरू झाल्यानंतर नाशिक महापालिकेची शहर बससेवा अद्याप सुरु झालेली नाही. आता नाशिककरांना नवीन वर्षात बससेवेची भेट मिळणार असून याकरिता 26 जानेवारी 2021 हा मुहूर्त ठरला आहे. यात पहिल्या टप्प्यात 50 बसेस शहरात ठराविक मार्गावर फिरणार असून मे महिन्यापर्यंत 250 बसेस शहरातील मार्गावर धावणार असल्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्यावतीने शहरात सुरु करण्यात येणार्‍या महापालिका शहर बससेवा सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.16) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह अधिकारी व ठेकेदार कंपनी प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत नाशिक महापालिका शहर बससेवेचा शुभारंभ येत्या 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिनी)2021 रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याकरिता शहरातील मोजक्या मार्गावर ट्रायल रन ही 15 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. यानंतर त्यास अंतिम स्वरुप देण्यात येऊन प्रत्यक्ष पहिल्या टप्प्यातील 50 बसेस या 26 जानेवारीला शहरातील ठराविक रस्त्यावर धावणार आहे. यापार्श्वभूमीवर संबंधीत अधिकार्‍यांना सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून माजी मुख्यमंत्री फडवणीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून शहर बससेवा प्रकल्पांच्या कामाला गती देण्यात आली आहे. महापालिका शहर बससेवेकरिता एक कंपनी स्थापन करण्यात आली असून ऑपरेटर नियुक्तीनंतर शहरात सीएनजीच्या 200 व डिझेलच्या 50 अशा अडीचशे बसेस गेल्या मार्च महिन्यात शहरात दाखल झाल्या असून त्यांची आरटीओ पासिंग झाली आहे. गेल्या मे महिन्यात मनपा शहर बससेवा सुरू करण्यात येणार असताना आलेल्या करोना साथीने हा प्रकल्प थांबला गेला होता.

शहर बससेवेसाठी प्रस्तावित तपोवन व सिन्नर फाटा येथील डेपोंची जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच एस. टी. महामंडळाचे निमाणी बस स्थानक, नाशिकरोड येथील टर्मिनल, नाशिकरोड येथील एस. टी. महामंडळाचे आनंदनगर येथील बसडेपो व बससेवेच्या आयटीएमएस यंत्रणेचे कंट्रोल कमांड सेंटर याठिकाणी कामे सुरु झाली आहे. आता शहरातील ठराविक गर्दीच्या मार्गावर पहिल्या टप्प्यात पन्नास बसेस नवीन वर्षात 26 जानेवारीला धावणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या