Friday, January 23, 2026
Homeक्राईमकर्तव्याचा करिश्मा की व्यवस्थेचे अपयश ?

कर्तव्याचा करिश्मा की व्यवस्थेचे अपयश ?

खाडे यांचे कौतुक तर हवंच || पण व्यवस्थेच्या सडलेल्या भागाकडे दुर्लक्ष का ?

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

जिल्ह्यात सध्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांची जोरदार चर्चा आहे. खाडे यांनी काही दिवसांतच सुसंघटित, धाडसी आणि लक्षवेधी कारवायांनी अवैध दारू व्यवसाय, जुगार, गुटखा, मावा यांसारख्या अनेक बेकायदेशीर गोरखधंद्यांवर थेट कारवाई केली. जनतेत उत्साह, सामाजिक माध्यमांत कौतुकाचा पूर, आणि पोलीस खात्याच्या कामगिरीबाबत निर्माण झालेला नव्याने विश्वास यामुळे या अधिकार्‍याचं नाव सर्वत्र झळकू लागलं आहे. मात्र, या सर्व सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्नही विचारले गेले पाहिजेत; विशेषतः व्यवस्थेबाबत.

- Advertisement -

सरकारी यंत्रणांमध्ये प्रत्येक पदाची काही ठरलेली जबाबदारी असते. पोलीस अधिकार्‍याने कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, गुप्त माहितीवर कार्यवाही करणे हे त्याच्या कार्यभाराचाच भाग आहे. मग एक अधिकारी आपले काम व्यवस्थित करत असेल, तर त्याच्या भोवती ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘रियल हिरो’ अशा बिरूदांचा फुगा का फुगतो? उत्तर अगदी स्पष्ट आहे, कारण बहुसंख्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी केवळ काम केल्याच्या नुसत्या ‘दाखल्यापुरते’ राहतात. कारवाई होत नाही, कागदोपत्री गुन्हे दडवले जातात, तक्रारी दुर्लक्षित होतात आणि अशा परिस्थितीत जेव्हा एखादा अधिकारी प्रामाणिकपणे, जाहीरपणे आणि तडफेने काम करतो, तेव्हा समाज त्याचं कौतुक करत नाही, तर ‘आश्चर्य’ व्यक्त करतो. हेच त्या व्यवस्थेचं दुर्दैव आहे.

YouTube video player

खाडे यांचं काम कौतुकास्पद असले, तरी त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कारवायांनी व्यवस्थेतील जुने प्रश्नही पुन्हा समोर आणले आहेत. ज्या अवैध धंद्यांवर आता धाड टाकली जाते आहे, तेच धंदे मागील कित्येक महिन्यांपासून, वर्षांपासून खुलेआम सरू होते. म्हणजेच याआधीचे स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हे सारे डोळ्यांदेखत हे गैरप्रकार सहन करत होते?, नव्हे त्यांचे या धंद्यांना पाठबळ होते हे चित्र अत्यंत धक्कादायक आहे. एक प्रशिक्षणार्थी अधिकारी काही दिवसांत जे पाहू शकतो, त्याकडे स्थानिक अधिकार्‍यांचे इतक्या वर्षांत का लक्ष जात नाही? की त्यांनी मुद्दाम डोळेझाक केली होती? या प्रश्नांची उत्तरं जितकी कठोर आहेत, तितकीच ती अस्वस्थ करणारीही आहेत.

अवैध धंदे व त्यांवर पोलिसांकडून होत नसलेली कारवाई यामध्ये मोठे ‘अर्थ’कारण दडलेले आहे, हे काय वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र सध्या असे झाले आहे की, आपणच नियम तोडतो आणि मग पोलिसांनी कारवाई केली की त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतो ही मनोवृत्ती सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. पोलीस अधिकार्‍यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवण्याऐवजी अविश्वास आणि उपहास टाकणे, आणि मग एखादा अधिकारी सजगता दाखवतो तेव्हा त्याचं कौतुक करणे ही मानसिकता धोका निर्माण करते. या व्यवहारात सातत्य, पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना कुठेच दिसत नाही.

व्यवस्थेच्या अपयशात नायकांची निर्मिती
प्रशिक्षणार्थी अधिकार्‍याचे उत्साही प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी असले तरी त्यातून आणखी एक गंभीर वस्तुस्थिती समोर येते ती म्हणजे, आपली यंत्रणा इतकी कुचकामी झाली आहे की, व्यक्तीगत जोशालाच आपण ‘परिवर्तन’ समजतो. कोणीतरी एखादा अधिकारी जोमाने काम करतो, आणि लोक लगेच त्याला ‘नायक’ मानतात. मात्र ही एक व्यक्तीपुरती मर्यादित असते. यामध्ये सातत्य राहात नाही. त्या अधिकार्‍याच्या बदलीनंतर पुन्हा व्यवस्थेत जुनाच साचलेला ढिसाळपणा परत येतो. खाडे यांच्या बाबतीत तेच होणार का? कारण खाडे हे प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ लवकरच संपेल, मग पुढे काय? जर पोलिसिंगसाठी विशिष्ट व्यक्ती हवी लागते, तर ती व्यवस्था सक्षम नाहीच, असंच स्पष्ट होतं.

कामगिरी व्हायरल क्लिप्सवर आधारित नसावी
कोणत्याही क्षेत्रातील प्रभावी कामगिरी ही फक्त सीन, स्टंट किंवा समाजमाध्यमांवरील व्हायरल क्लिप्सवर आधारित नसावी. पोलिसिंगसारख्या संवेदनशील आणि लोकशाही संस्थेमध्ये सर्वाधिक गरज आहे ती कायद्यानुसार काम करण्याची, प्रक्रिया रेकॉर्ड ठेवण्याची आणि न्यायव्यवस्थेला पूरक ठरण्याची. जर कायदा आणि कार्यवाहीची प्रक्रिया पारदर्शक, वेळेत, आणि सातत्यपूर्ण नसेल, तर एक अधिकार्‍याचा जोश देखील अपुऱाच ठरतो. तो फक्त क्षणिक परिवर्तन करतो, कायमस्वरूपी नव्हे. खाडे यांच्यासारखे अधिकारी व्यवस्था जागृत करतात, समाजात आशा निर्माण करतात हे खरे आहे. पण केवळ त्यांच्यावर भार टाकून आपण मोकळे होऊ शकत नाही. जोपर्यंत संपूर्ण पोलीस व्यवस्था जबाबदार, पारदर्शक आणि सजग होत नाही, तोपर्यंत या ‘नायक’गिरीचं आयुष्य फारच अल्पकाळ टिकणार आहे. त्यामुळे आपल्याला हवे आहेत, नियमांनुसार काम करणारे अधिकारी, त्यांना पाठबळ देणारे वरिष्ठ.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य?

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री...