मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
नाशिक महापालिकेत क्लार्क, शिपाई व सहाय्यक आयुक्त तसेच शासनाच्या अन्य विभागात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून बेरोजगारांची तब्बल ५३ लाख ५० हजार रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरूध्द ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला अहे.
या संदर्भात रविराज महेंद्र पाटील (३०, रा. कृषिनगर, मालेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन बबनराव चिखले, कृष्णा ठाकूर (दोन्ही रा. नाशिक) व संदीप परब (रा. मुंबई) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघा संशयितांनी संगनमत करून पाटील यांचा विश्वास संपादन केला. नाशिक महापालिकेत त्यांच्या भावाला क्लार्क व पत्नीला सहाय्यक आयुक्त पदावर नोकरी लावून देतो असे आश्वासन या तिघा संशयितांनी दिले. यासाठी त्यांनी १५ लाख रूपये पाटील यांच्याकडून उकळले. यात रविराज पाटीलच नव्हे तर त्यांच्या संपर्कातील अन्य बेरोजगारांना देखील या त्रिकुटाने आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.
या तिघांनी अनेकांना उत्पादन शुल्क व विक्रीकर विभागात तर काहींना पाटबंधारे विभागात शाखा अभियंता पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवले. अन्य बेरोजगारांकडून त्यांनी ३८ लाख ५० हजार रूपये घेतले. जवळपास ५३ लाख ५० हजार रूपयांचा गंडा या त्रिकुटाने घातल्याचे निदर्शनास आले. बराच काळ उलटल्यानंतरही भाऊ व पत्नीला नोकरी मिळू शकली नसल्याने रविराज पाटील यांनी पैसे परत मिळावेत म्हणून संशयितांकडे तगादा सुरू केला. मुख्य संशयित सचिन चिखले याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसात धाव घेवून फिर्याद दिली. या त्रिकुटाने शहरात अजून कुणाला गंडा घातला याचा शोध पोलीस घेत आहेत.





