अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यात गाजलेल्या सिस्पे, ट्रेडस, इन्फिनाईट बिकन कंपन्यांच्या बहुचर्चित गुंतवणूक घोटाळ्याने संपूर्ण राज्यात आर्थिक जगतात खळबळ उडवली आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत सुरक्षित गुंतवणूक आणि मोठा परतावा अशा गोड भाषेत चाललेले हे व्यवहार आता हजारो नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात निराशा घेऊन थांबले आहेत. परंतु पोलिसांनी सुरू केलेल्या निर्णायक कारवाईमुळे गुंतवणूकदारांना आता आशेचा एक छोटासा पण ठोस किरण दिसू लागला आहे. तपासाच्या दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा ‘मनीट्रेल’ शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. विविध बँक खात्यांमधील व्यवहारांचा सखोल मागोवा घेताना पोलिसांना अगस्त मिश्रा आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांत सुमारे 50 कोटी रूपयांची रक्कम आढळली. पोलिसांनी तत्काळ या रकमेवर कारवाई करत ती गोठवली आहे. या कारवाईनंतर हजारो गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सुरूवातीला महिन्याला 10 ते 15 टक्के परतावा देण्याच्या आकर्षक ऑफरच्या माध्यमातून या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भुरळ घातली. सिस्पे, ट्रेडस, इन्फिनाईट बिकन यासह इतर नावांनी जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्क उभारले गेले. नवनाथ औताडे आणि अगस्त मिश्रा या दोन प्रमुख सूत्रधारांनी हजारो एजंटच्या माध्यमातून लोकांकडून कोट्यवधी रूपयांची उभारणी केली. गावागावातून लोकांनी आपली बचत, सोने, अगदी घरे, जमीन विकूनही या योजनांमध्ये पैसा गुंतवला. अनेक शासकीय नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, कामगार यामध्ये गुंतले गेले. काही महिन्यांपर्यंत आकर्षक परतावा देत विश्वास मिळवला गेला. मात्र, अचानक कंपनीने व्यवहार बंद केले, कार्यालये रिकामी झाली आणि संचालक मंडळ पसार झाले. जिल्ह्यातील श्रीगोंदा, सुपा, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला असून या सर्व प्रक्रियेला वेळ लागत आहे.
या तपासाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे करत आहेत. त्यांनी तपासाला वेग दिला आहे. आतापर्यंत सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार औताडे आणि मिश्रा मात्र अद्याप पसार आहेत. एकीकडे पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असून दुसरीकडे त्यांच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा ‘मनीट्रेल’ शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला. विविध बँक खात्यांमधील व्यवहारांचा सखोल मागोवा घेताना पोलिसांना अगस्त मिश्रा आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांत सुमारे 50 कोटी रूपयांची रक्कम आढळली. पोलिसांनी तत्काळ या रकमेवर कारवाई करत ती गोठवली आहे. या कारवाईनंतर हजारो गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंतच्या तपासात आणखी काही संशयास्पद व्यवहार समोर आले असून, पोलिसांनी त्यांनाही गोठवण्याची तयारी केली आहे. ही फक्त सुरूवात आहे; संपूर्ण नेटवर्क उलगडल्यावर गोठवलेल्या रकमेचा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फसवणुकीची व्याप्ती आणि लोकांचे नुकसान पाहता पोलिसांनी आता महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपींच्या मालमत्तांची यादी तयार केली जात असून, जमीन, बँक खाती, तसेच इतर संपत्तीची माहिती गोळा केली जात आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही मालमत्ता जप्त करून तिच्या विक्रीतून गुंतवणूकदारांना काही प्रमाणात पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत तपासाचा वेग वाढल्याने आणि 50 कोटी रूपयांची रक्कम गोठवल्याने गुंतवणूकदारांत थोडी आशा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील सिस्पे, ट्रेडस, इन्फिनाईट घोटाळा हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही, तर समाजाच्या विश्वासाचा, प्रशासनाच्या दक्षतेचा आणि आर्थिक जागरूकतेचा आरसा आहे. हजारो लोकांचा घाम गाळून कमावलेला पैसा काही मोजक्या लोकांच्या लालसेमुळे वार्यावर उडाला. तरीही, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि मोठ्या प्रमाणात निधी गोठवण्याची कारवाई हे सकारात्मक पाऊल आहे.
एजंटांवरही पोलिसांची करडी नजर
या घोटाळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे एजंटांचे जाळे. कंपनीने मोठ्या कमिशनच्या आमिषाने अनेक एजंट तयार केले. त्यांनी आपल्या मित्रपरिवारात, समाजात आणि नातेवाईकांमध्ये ही स्कीम विश्वासाने पुढे नेली. काही एजंटांनी स्वतःही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, तर काहींनी लोकांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केली. आता हे एजंट पोलिसांच्या रडारवर आले असून, काहींना अटक केली आहे. तर काहींकडे चौकशी केली जात आहे. ज्या एजंटांनी जाणूनबुजून लोकांना फसवले व कमिशन घेतले त्यांना गुन्ह्यात आरोपी केले जात आहे.
राजकीय आणि प्रशासकीय नात्यांचा शोध
या कंपन्यांनी अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांना काही लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहिल्याने या कंपन्यांना वैधतेचा आभास निर्माण झाला. सोशल मीडियावर या संबंधांबद्दल चर्चा रंगल्या आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात सहभागी असलेल्या किंवा या कंपन्यांना संरक्षण देणार्या प्रत्येकाची जबाबदारी ठरवावी अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, या कंपन्यांमुळे हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. पोलिसांनी निष्पक्ष तपास करून सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.




