सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
पैशांमध्ये (Money) फार जीव असणारा एक उच्चपदस्थ अधिकारीही खरातचा निश्चित भक्त बनला होता. लाख-दोन लाखांशिवाय कुठल्याही फाईलला हात न लावणाऱ्या या अधिकाऱ्याला खरातचे कारनामे उघड झाल्याने तीस-पस्तीस कोटींवर पाणी सोडण्याची वेळ आली असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे त्याची सध्या झोप उडाली असल्याची चर्चा आहे. हा अधिकारी आधी निफाडचा प्रांत होता. तहसीलदारचा निकाल विरोधात गेला की लोक प्रांताकडे अपिलात जायचे. त्यावेळी लाखात पैसे घेऊन निकाल तुमच्या बाजूने देतो असं तो म्हणायचा. एकदा पैसे हातात पडले की थेट निकाल न देता फाईल पुनर्विचारासाठी तहसीलदारांकडे पाठवण्याचा निकाल देऊन मोकळा व्हायचा. त्यामुळे अडचणीत आलेल्यांना पुन्हा काही महिने तहसीलच्या फेऱ्या मारण्याशिवाय पर्याय रहायचा नाही.
सिन्नर तालुक्यातल्या (Sinnar Taluka) पास्ते गावाच्या हद्दीत त्याचवेळी सुरुंग बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला होता. त्यात तालुक्यातल्या अनेक निष्पापांचा जीव गेला होता. दहावीची परीक्षा दिलेला एक विद्यार्थी या कंपनीत कामाला जात होता. तो ही स्फोटात मरण पावला होता. राजस्थानचे १८-२० कामगार तेव्हा कंपनीत कामावर होते. मात्र, त्यांची नावे शेवटपर्यंत कोणालाही कळाली नाहीत. ठार झालेल्यांच्या यादी ती नावे आली देखील नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी याच प्रांतावर सोपवण्यात आली होती. त्याचा त्यावेळचा गोलमाल अहवाल सिन्नरकर आजही विसरलेले नाहीत. स्फोटात मृत झालेल्या अल्पवयीन मुलाला कामावर ठेवण्याचे बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारासह कंपनीच्या मालकावर तसा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्याचे औदार्यही खिसे गरम झालेल्या या अधिकाऱ्याने तेव्हा दाखवले नव्हते. त्यानंतर इंडिया बुल्सचा प्रकल्प सिन्नरला आला. त्यावेळी भूसंपादनांचे काम पुन्हा याच अधिकाऱ्याकडे आले होते.त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना तुम्ही शेतजमिन दिली नाही तर सरकार तुमची जमीन ताब्यात घेईलच. मात्र, त्यानंतर तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही असा दम भरत हाच अधिकारी फिरत होता. त्यावेळी शेतकऱ्यांशी यशस्वीपणे चर्चा करून शेतजमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा करीत त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळच्या केंद्र सरकारकडून याच अधिकाऱ्यामुळे पाठ थोपटून घेतली होती.
हे देखील वाचा : Ashok Kharat News : विकृत खरातने ‘या’ बड्या नेत्याला दिला होता मुख्यमंत्री न होण्याचा सल्ला
मुसळगावच्या (Musalgaon) सहकारी औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात पार पडलेल्या मुसळगावच्या बैठकीत ‘एक इंच ही जमीन देणार नाही’ असं शेतकरी शेवटपर्यंत म्हणत होते. मात्र, बैठकीला उपस्थितीत असल्याबद्दलची सही प्रत्येकाने रजिस्टरमध्ये करावी असा आग्रह हाच अधिकारी शेतकर्यांना करत होता. त्यानंतर दोन-चार शेतकरी उभे राहिले आणि आम्ही आमची शेतजमीन द्यायला तयार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर बैठक संपल्याचा जाहीर झालं आणि याच शेतकऱ्यांच्या नावाने ठराव लिहून उपस्थित सर्व शेतकर्यांनी सहमती दिल्याचे दाखवून पुढे भूसंपादनांचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांनी बैठकीत जमीन देण्याची तयारी दाखवली होती, त्या सर्वांची शेतजमीन पुढे काही वर्षात सेझमधून वगळण्यात आली. या शेतकऱ्यांनी वसाहतीतीलच साईवेज हॉटेलमध्ये त्याचे जंगी सेलिब्रेशन केल्याचे सिन्नरकरांनी तेव्हा पाहिलं होतं.
शेतजमीन (Land) घेतली तर ती कुठेतरी बाहेर कळणारच आहे. एवढे पैसे कुठून आणले हे सांगणे आणि ते सिद्ध करणे आणखी अवघड, त्यापेक्षा जादा व्याज मिळेल आणि पैसेही सेफ राहतील असे सांगून खरातने या अधिकाऱ्याकडून ३० कोटी घेतल्याचे व एकाला व्याजाने दिल्याची चर्चा आहे. या अधिकाच्यासारखी महसूल खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी खरातकडे करोडो रुपयांची सेफ गुंतवणूक केल्याची चर्चा दबक्या आवाजात महसूल विभागात होत आहे. बख्खळ पैसा कमावल्यानंतरही याची पैशाची हाव जातच नव्हती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळातील शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एका मंत्र्यांचा ओएसडी म्हणून हा अधिकारी रुजूही झाला होता. आपणही याच जिल्ह्यातले असल्याचा आवही त्यासाठी त्याने आणला होता. मात्र, अल्पावधीतच पैशासाठी कुठल्याही तडजोडी करण्याच्या त्याच्या सुरस कथा या मंत्र्यापर्यंत पोहचल्याने या अधिकाऱ्याचे सारे अधिकार त्यांनी काढून घेत या अधिका-याला केवळ कागदावरचा वाघ बनवूनच मागे-मागे फिरवल्याची त्यावेळी चर्चा होती. अशा सर्वच बाजूंनी नावलौकिक कमावलेल्या या अधिकाऱ्याला खरातच्या रुपाने देवदूतच भेटला. अमाप पैसा गुंतवायला हक्काचा माणूस भेटला. त्यामुळे खरातकडे त्याचे येणे-जाणेही वाढले. खरातच्या मूलीच्या लग्नात हा अधिकारी इतर अनेक अधिकार्यांसारखा सपत्नीक उपस्थित होता असं लग्नातील प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. खरातचे पितळ उघड झाल्यानंतर या अधिकाऱ्याची झोप उडाली असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : नराधम अशोक खरातवर सहा गुन्हे; अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आकडा वाढणार
शेतजमीन घेतली लिहून
सेझमधून शेतजमिनी वगळण्यासाठी सिन्नरच्याच एका माजी आमदाराच्या मुलाकडून या अधिकार्याने आपल्या एका नातेवाईकाच्या नावावर एक एकर शेतजमीन लिहून घेतल्याची चर्चाही त्यावेळी होती. इंडियाबुल्स सेझच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर या माजी आमदाराच्या मूलाच्या शेतात तारेचे कुंपण केलेली ही शेतजमीन कित्येक वर्षे तशीच पडून होती. मलिदा कमावणारी पोस्टींग कशी मिळवायची यात हा अधिकारी चांगलाच तरबेज होता. पुढे त्याने एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी पदावर नियुक्ती मिळवली. तेथे अधिकृतपणे तीनच वर्ष राहता येत असताना त्याने एक वर्षाची मुदतवाढ मिळवली. या चार वर्षाच्या कार्यकाळात या अधिकाऱ्याने शंभर कोटी छापल्याची चर्चा त्यावेळी होत होती. हे पद सोडता सोडताच आपल्यापेक्षा अनेक वरिष्ठांना डावलून या अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदाची खुर्ची पटकावली. कमावलेला एवढा पैसा ठेवायचा कुठे हा प्रश्न कदाचित या अधिकार्याला सतावत असावा. त्यातूनच जादा परतावा मिळण्याच्या आशेने या अधिकाऱ्याने करोडो रुपयांची गुंतवणूक खरातच्या सांगण्यावरून केल्याची चर्चा आहे.





